काबूल विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू

काबूल – अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील पोलीस यंत्रणांनी हा आत्मघाती हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला त्याचवेळी अफगाणिस्तानच्या उपाध्यक्षांचा वाहनताफा तेथून जात होता. परंतु, हा वाहनताफा बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावला त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या समर्थकांना लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणला गेल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी बॉम्बस्फोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. या स्फोटात अनेकवेळा सामान्य नागरिकांचा मोठ्याप्रमाणात बळी जात आहे.