breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला “अटल”जींचे नाव; प्रकल्प लवकर मार्गी लावणार

पिंपरी, (महा-ई-न्यूज)- पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या भूमिकेवर आम्ही “अटल’ आहोत, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्‍ती केले.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे दि.16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. देशाच्या राजकारणातील “भारतरत्न’ हरवल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्‍त होत होती. त्यावेळी देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात अटलजींचे नाव अजरामर राहील, अशा भावना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्‍त केल्या होत्या.

अनेक वर्षांपासून देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केवळ चर्चेत होता. अखेर त्याला मूर्त रुप मिळाले असून नदी सुधार प्रकल्पासाठी पवना, इंद्रायणी नद्यांचा सर्वे झाला आहे. त्यात भराव टाकलेली ठिकाणे, पात्रालगतची गॅरेज, हॉटेल व बांधकामांची माहिती संकलित केली आहे. तर, थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी, नाल्यांची माहिती घेतली आहे. निळी व लाल पूररेषा विचारात घेऊन नद्यांचा विकास केला जाईल. त्यासाठी महसूल विभागाकडून नदी पात्राची माहिती, नकाशे मिळविण्यात आले आहेत. प्रकल्पात इंद्रायणी नदीचा पहिल्या टप्प्यात तळवडे ते चिखलीदरम्यान प्रस्तावित डीअर पार्कचा परिसर, तसेच आळंदी ते चऱ्होलीदरम्यानचा हरित पट्टा विकसित केला जाणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली आहे.

“नमामी गंगा’च्या धर्तीवर प्रकल्प 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी “नमामी गंगा’ हा नदीसुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने मे. एचएसपी डेव्हलपमेंट अँण्ड मॅनेजमेंट कन्सलटंट या सल्लागार संस्थेची नेमणूक केली होती. अहमदाबाद येथील साबरमती रिव्हर फ्रंन्ट प्रकल्पाचे काम या संस्थेने केले आहे. संबंधित संस्थेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच अहवाल तयार केला आहे. त्यानंतर तात्काळ या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याद्वारे नदीतील पाणी स्वच्छ राहील. सांडपाणी नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उपाययोजना करुन नदीकाठचा विकास करण्यात येईल. त्याद्वारे चांगले पर्यटन स्थळ विकसित करण्याबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे.

– संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button