आजही “भाजप”चा कारभार चालतोय “अजित पवारां”च्या सूचनेवर

शाळा इमारतीच्या बांधकाम खर्चात एक कोटींची वाढ
पिंपरी – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम करताना जोत्याची उंची वाढविण्याची सूचना इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात केली होती. त्या सूचनेनुसार अधिका-यांनी सुधारित प्रस्ताव बनविला आहे. त्यामध्ये अन्य कामांची भर घालून 1 कोटी 18 लाख रुपयांच्या वाढीव खर्चास भाजपच्या पदाधिका-यांनी मान्यता दिली आहे. यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार पवार यांच्या सूचनेवर चालत असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरक्षण क्रमांक 175 मध्ये (चिंचवड, दळवीनगर) शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तळमजला आणि वाहनतळ तयार करण्यात येणार होते. शाळेच्या समोरील रस्त्याच्या बरोबरीने जोत्याची लेव्हल दीड मीटर ठरविली होती. दरम्यान, इमारतीचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार यांनी शाळेला लागून असलेल्या नाल्याच्या एचएफएलनुसार जोत्याची उंची वाढविण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या होत्या. त्यावर जोत्याची उंची 1.7 मीटर वाढविण्यात आली. त्यानुसार जोत्याची भराई करण्याच्या कामात वाढ होऊन कॉक्रीट व स्टीलच्या परिमाणात देखील वाढ झाली. परिणामी, कामाचा खर्च अंदाजपत्रकीय खर्चाहून अधिक वाढला आहे.
तथापि, अधिका-यांनी अंदाजपत्रकीय खर्चाची मर्यादा ओलांडून प्रस्तावात सिमाभिंत बांधण्याच्या कामाचा समावेश केला. तसेच, प्रेमलोक पार्क येथील ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमिक शाळा नवीन इमारतीत हलविण्याचे नियोजन असल्याने दवळवीनगर येथील शाळेच्या इमारतीच्या बांधकामात विषयांकीत वाढ करण्यात आली. त्यामुळे खर्चाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेत 1 कोटी 18 लाख रुपयांची वाढ झाली. त्यानुसार सुधारित अंदाजपत्रकातील खर्चाची रक्कम 4 कोटी 10 लाख एवढी होते. मान्य निविदा दरानुसार कामाच्या खर्चात 91 लाख 70 हजार 970 ने वाढ होऊन एकूण खर्च 3 कोटी 18 लाख एवढा होत आहे.
दळवीनगर येथील ही शाळा सुरू करण्यासाठी अंदाजपत्रक सुधारित करण्याची गरज आहे. त्यानुसार सुधारित चार कोटी 10 लाख एवढ्या खर्चास व त्याप्रमाणे 1 कोटी शहर विकास आराखड्यातून या कामावर वर्ग करण्यास मान्यता देणेची गरज आहे. त्यासाठीचा प्रस्ताव अधिका-यांनी बुधवारी (दि. 23) स्थायी समिती सभेपुढे ठेवला होता. त्याला स्थायीने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसारच भाजपचे पदाधिकारी कामकाज करत असल्याचे यावरून दिसत आहे.