breaking-newsमुंबई

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले.

अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.

तडकाफडकी नोटीस बजावल्यानंतर ठाणे खंडणी विभागाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

“मी गेली अनेक वर्ष लोकांसाठी आंदोलन करतोय. कोणतंही आंदोलन मी स्वत:साठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोव्हिड सेंटरसाठी होतं. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून मला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे” असे अविनाश जाधव यांनी फेसबुकवर लाईव्ह येत सांगितले.

कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबईत ‘थायरोकेयर लॅब’विरोधात आंदोलन केलं होतं. या लॅबमधून कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट येत असल्याच्या तक्रारीनंतर मनसेने ही लॅब बंद पाडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button