अमेरिकेला धमकावण्याचे धाडस करू नका

अध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा
वॉशिंग्टन – अमेरिकेला धमकावण्याचे धाडस करू नका तसे कराल तर इतिहासात पुर्वी कधीही झाले नव्हते इतके गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. आपल्या ट्विटर अकौंटवर त्यांनी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांना थेट हा इशारा दिला आहे.
अमेरिका आता तुमच्या हिंसक शब्दांना आणि मृत्युच्या इशाऱ्याला सोसणारा देश राहिलेला नाही तेव्हा जपून राहा असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. हा लिखीत स्वरूपातील इशारा त्यांनी कॅपिटल लेटर वापरून दिला असल्याने तो गंभीर मानला जात आहे. आत्तापर्यंत इराणला इतका कडक इशारा अमेरिकेकडून दिला गेला नव्हता.
इराणचे अध्यक्ष रौहानी यांनी तत्पुर्वी अमेरिकेला इशारा देताना सिंहांच्या शेपटीशी खेळू नका असे म्हटले होते त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. इराणबरोबर संघर्ष केला तर महायुद्ध होईल असेही रौहानी यांनी म्हटले होते. या आधी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात मोठा संघर्ष निर्माण झाला होता पण आता उत्तर कोरिया हे सरळ झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपला मोर्चा इराणकडे वळवला आहे. त्यांनी इराणबरोबरचा अणुकरार रद्द करून इराणवर निर्बंध लागू करून त्यांना वठणीवर आणण्याची उपाययोजना केली आहे.