अखिलेश यादव यांच्याकडून शासकीय बंगल्याची मोडतोड

लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचा शासकीय बंगला अधिकृतपणे राज्य सरकारच्या मालमत्ता विभागाच्या ताब्यात दिला आहे. मात्र, बंगला रिकामा करताना मालमत्तेची प्रचंड नासधूस करण्याचे आता उघडकीस आले आहे. हा बंगला लखनौतील विक्रमादित्य मार्गावर होता. माजी मुख्यमंत्र्यांनी बंगले सोडावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 7 मे रोजी दिला होता. त्यानुसार अखिलेश यांनी बंगला सोडला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मालमत्ता खात्याने नारायण दत्त तिवारी, मुलायमसिंह यादव, कल्याण सिंह, मायावती, राजनाथ सिंह, अखिलेश यादव यांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून अधिकृत निवासस्थाने सोडावीत, असे आदेश दिले होते.
अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रात्री त्यांचा अधिकृत बंगला सोडला. त्याच्या चाव्या त्यांनी मालमत्ता विभागाकडे दिल्या, असे मालमत्ता खात्याचे अधिकारी योगेश कुमार शुक्ला यांनी सांगितले. नारायणदत्त तिवारी यांनी अजून बंगला सोडलेला नाही. त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी पती खूप आजारी असल्याचे कारण देत आणखी वेळ देण्याची मागणी केली आहे. नारायणदत्त तिवारी हे अंथरुणाला खिळलेले असून ते दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांना एकटे सोडून लखनौत येऊन बंगला सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांच्या बंगल्यात मोडतोड करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याची शहानिशा केली जाईल. जर मोडतोड केली असेल तर संबंधितांना नोटीस बजाविण्यात येईल. तर अखिलेश यादव यांची प्रतिमा खराब करण्यासाठी ही चित्रफीत व्हायरल करण्यात आली आहे, असा खुलासा समाजवादी पक्षाने केला आहे.