breaking-newsक्रिडा

रोहित शर्मा अखेर यो-यो चाचणीत उत्तीर्ण

  • इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश 

बंगळुरु – भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय आणि टी-20 संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यो-यो फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाला. याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून रोहित शर्माच्या संघातील सहभागाबद्दल असणारा संभ्रम अखेर दूर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ठरवून दिल्याप्रमाणे किमान गुण मिळवत आपली जागा निश्‍चित केली आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माच्या जागी अजिंक्‍य रहाणे याला पर्यायी खेळाडू म्हणून सज्ज राहण्यास सांगितले होते. रोहितने फिटनेस चाचणीनंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फिटनेस चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतरचा फोटो शेअर केला. रोहित आता भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

याअगोदर आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या दोन्ही यो यो टेस्टमध्ये रोहित शर्मा अपयशी ठरला होता. त्यामुळे रोहितच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र तो उत्तीर्ण झाल्याने भारतीय संघासाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात आहे. रोहित या टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्याने इंग्लंड दौऱ्यासाठी अजिंक्‍य रहाणेच्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण, दुसऱ्या यो यो टेस्टमध्ये रोहित अपयशी ठरल्यास रहाणेचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्‍यता होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर सर्व खेळाडूंची यो यो टेस्ट बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घेण्यात आली. या टेस्टमध्ये प्रत्येक खेळाडूला 16.1 गुण मिळवणे बंधनकारक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या फिटनेसचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरू केलेली यो यो फिटनेस टेस्ट महत्त्वाची आहे.

फिटनेससोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. इंग्लंडच्या आगामी दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार असलेल्या विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे ही संधी गमवावी लागली. मात्र इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी त्यालाही यो यो चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागलेच. विशेष म्हणजे संघातील सर्वाधिक वयस्कर खेळाडू असलेल्या 36 वर्षीय महेंद्रसिंग धोनीने यो यो चाचणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button