breaking-newsपुणेमहाराष्ट्र

महसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर

जिल्ह्य़ात ‘कोर्ट ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रणाली कार्यान्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कोर्ट ट्रॅकिंग सिस्टिम’ अर्थात नवी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून ती कार्यान्वितही झाली आहे. त्यामुळे महसूल दाव्यांची माहिती एका क्लिकवर प्राप्त होत आहे.

नव्याने विकसित करण्यात येणारी संगणक प्रणाली उच्च नायालयाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन खटल्यांच्या सुनावणीच्या तारखांच्या आधी संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या संगणकावर खटल्याच्या तारखेची आठवण करून देणारा संदेश येणार आहे. याबरोबरच खटल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, निपटारा होण्यासाठी संगणक प्रणाली उपयोगी ठरत आहे. मागील दीड वर्षांपासून या संगणक प्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काम सुरू होते.

जिल्ह्य़ातील महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांची माहिती संगणक प्रणालीत भरण्याचे काम करण्यात आले आहे. या संगणक प्रणालीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामधील महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, पुणे जिल्ह्य़ामध्ये महसूल विभागाशी निगडित न्यायालयीन प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्ह्य़ात पुनर्वसनाची तीनशे प्रकरणे प्रलंबित असून मागील वर्षांतील एक हजारपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ  या यंत्रणांकडून दोन वर्तुळाकार रस्ते प्रस्तावित आहेत.

तसेच पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प यांच्यामुळे जिल्ह्य़ातील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाबरोबरच बाहेरील अनेकांनी केवळ गुंतवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच प्रकल्पबाधितांच्या जमिनी हस्तांतरित केल्यानंतर योग्य पुनर्वसन न करणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्य़ातून न्यायालयात दाखल असलेल्या जमिनींबाबतच्या प्रकरणांचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुणे जिल्ह्य़ात प्रायोगिक तत्त्वावर ही संगणक प्रणाली राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

संगणक प्रणालीमध्ये काय

महसूल विभागाशी निगडित न्यायालयीन प्रकरणांची माहिती, वादी-प्रतिवादी, नेमके प्रकरण काय?, तत्कालीन अधिकारी, न्यायालयातील पुढची तारीख अशी विविध माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्याकरिता ‘कोर्ट ट्रॅकिंग सिस्टिम’ अर्थात नवी संगणक प्रणाली विकसित केली आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्य़ातील महसूल दाव्यांसाठी संगणक प्रणाली तयार केली आहे. ही प्रणाली कार्यान्वितही झाली आहे.    – रमेश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button