breaking-newsक्रिडामहाराष्ट्रमुंबई

पुढील वर्षी मुंबई मॅरेथॉन भल्या पहाटे?

धावपटूंना उकाडय़ाचा फटका बसू नये, यासाठी वेळेत बदल करण्याचे आयोजकांचे संकेत

देशभरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत यंदा अचानक वाढलेल्या उकाडय़ाचा शेकडो धावपटूंना फटका बसला. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात भरवण्याची मागणी होत होती. परंतु, स्पर्धेची तारीख अलीकडे घेणे शक्य नसले तरी, स्पर्धेची वेळ मात्र अर्धा तास आधी म्हणजेच पहाटे पाच वाजता ठरवता येईल, असे संकेत देण्यात येत आहेत.

यंदा रविवारी, २० जानेवारी रोजी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या आदल्या दिवसापासून हवामान अचानक बदलले व तापमानात वाढ झाली. याचा फटका धावपटूंना बसला. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, दम लागणे, पायात गोळे येणे अशा कारणांमुळे तब्बल ३ हजार २२६ धावपटूंना तातडीने उपचार घ्यावे लागले. स्पर्धेच्या ‘ड्रीम मॅरेथॉन’ प्रकारात सहभागी झालेल्या वृद्ध नागरिकांनाही वाढत्या तापमानामुळे सातत्याने विश्रांती घेऊन धाव पूर्ण करावी लागत होती.

स्पर्धेच्या दिवशी सकाळी कुलाबा वेधशाळेने २०.३ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद केली. या काळातील नियमित तापमानापेक्षा रविवारी किमान तापमानात १.४ अंश सेल्सियसची वाढ झाली होती. कमाल तापमानातही ४.१ अंश सेल्सियसची वाढ होऊन ते ३३.६ अंशावर गेले होते. याचा मोठा फटका धावपटूंना बसल्याचे सांगण्यात येत आहे.

मकरसंक्रांतीनंतर तापमानात वाढ होत जाते, असा आजवरचा अनुभव आहे. यंदाही जानेवारी महिन्यातील पहिले दोन आठवडे वातावरण थंड होते. मात्र, तिसऱ्या आठवडय़ात हवामान पालटले. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून ही स्पर्धा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घ्यावी किंवा पूर्णवेळ मॅरेथॉन ही सकाळी लवकर ५ वाजता सुरू करावी अशी मागणी धावपटूंनी केली आहे. मात्र, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशी-विदेशी उत्तम धावपटूंना वेगवेगळय़ा वातावरणात धावण्याचे आव्हान पेलावे लागते. त्यामुळे स्पर्धा जानेवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात घेणे शक्य नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या वर्षी ५.३० वाजता मॅरेथॉन सुरू करण्यात आली होती. मात्र या वर्षी झालेला त्रास पाहता ५.३० आधी सुरू करण्याचा विचार केला जात आहे, असे मुंबई मॅरेथॉनचे आयोजक आणि प्रोकॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी व्यवस्थापक विवेक सिंह यांनी सांगितले.

आजारी पडणाऱ्यांत वाढ  

मागील वर्षी मुंबईत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत २ हजार ३२४ धावपटू दुखापतग्रस्त झाले होते. यंदा त्यात एक हजारांनी वाढ झाली असून ३ हजार २२६ धावपटू विविध कारणांनी दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी ४१ जणांना निर्जलीकरणामुळे होणारे त्रास झाले, तर १४ धावपटूंना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन धावपटूंना गंभीर दुखापत झाल्याची माहिती एशियन हार्ट इन्स्टिटय़ूट रुग्णालयातील डॉ. विजय डिसिल्वा यांनी दिली. पायातून गोळे येण्याच्या तक्रारी सर्वाधिक होत्या, असे डॉ. डिसिल्वा यांनी सांगितले.

मार्गातच लघुशंका

धावपटूंना दरवर्षी एक पुस्तिका देण्यात येते. त्यात मार्गांच्या माहितीबरोबर, स्वच्छतागृहांची ठिकाणे, पाणी केंद्रे, आरामाची जागा, औषधोपचारांची केंद्रे नमूद करण्यात येतात. तरीदेखील धावपटू मार्गातच लघुशंका करत असल्याचे आढळून आले आहे. यंदाही वांद्रे-वरळी सेतूवर लघुशंका करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. लेखिका श्वेता समोटा यांनी लघुशंका करणाऱ्या धावपटूंचे छायाचित्रे काढून, ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली.

तापमानातील बदल हे न सांगता येणारे असतात, ज्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. नाताळ आणि नववर्षांनिमित्त धावपटू बाहेर गेलेले असतात, डिसेंबरमध्ये थांबलेला धावण्याचा सराव पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ातील रविवारी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.

-विवेक सिंह, मुंबई मॅरेथॉनचे आयोजक आणि प्रोकॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी व्यवस्थापक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button