breaking-newsआंतरराष्टीय

पायलट ‘आजारी’, जेटच्या २५ विमानांचे उड्डाण रद्द

एकावेळी बरेच कर्मचारी सुट्टीवर गेल्यास कोणत्याही कंपनीचे काम नक्कीच खोळंबेल. अशाचप्रकारे जेट एअरवेजच्या बऱ्याच पायलटनीच अचानक आजारपणाची रजा टाकल्याने कंपनीला एक दोन नाही तर तब्बल २५ विमाने रद्द करावी लागली. अडचणी भेडसावत असल्याने कंपनीने आपली १० विमाने रविवारी रद्द केली होती. त्यामध्ये आता भर पडली असून या रद्द झालेल्या विमानांची संख्या २५ वर गेली आहे. वेळेवर पगार मिळत नसल्याने मोठ्या संख्येने पायलट आजारपणाच्या सुट्टीवर गेले आहेत. सोमवारी २५ विमाने रद्द होण्याबरोबरच बऱ्याच विमानांना उशीरही झाला असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कंपनीच्या या कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांचा या परिस्थितीमुळे खोळंबा झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत. विविध मार्गांनी ते आपला रोष व्यक्त करत असताना आता त्यांनी अशाप्रकारे एकत्र आजारपणाच्या सुट्ट्या घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. ही परिस्थिती येत्या काळात आणखी बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या कंपनी विचित्र प्रकारे आर्थिक अडचणीत अडकली असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे कमी झालेले मूल्य ही यामागची कारणे असल्य़ाचे बोलले जात आहे. आता यामध्ये नेमकी कोणत्या मार्गावरील विमाने रद्द करण्यात आली आहेत याबाबत माहिती मिळाली नाही. पायलटनी सहकार्य केले नाही तरीही कंपनीचे काम नेहमीप्रमाणे सुरु राहील असेही जेट एयरवेजकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button