breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपसोबत युतीच्या अपेक्षेपोटी ‘शिवसेनेचे ‘शेर’ चिडीचूप’

  • महासभेत राष्ट्रवादीवर केली कुरघोडी
  • भाजपच्या विरोधातला आवाज ‘मावळला’

– अमोल शित्रे

पिंपरी- संतपीठ, भोसरी रुग्णालय आणि पीएमपीएमएल बस खरेदी या विषयांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या भाजप विरोधी शाब्दीक लढ्यात विरोधकांचा मित्र म्हणवून घेणा-या शिवसेनेच्या वाघांनी मागच्या दारावाटे पळ काढला. शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे आणि आमदार गौतम चाबुकस्वार यांनी सुध्दा यावर चक्कार शब्द काढला नाही. एरव्ही भाजप विरोधात थयथयाट करणा-या शिवसेनेच्या वाघांनी युतीच्या अपेक्षेपोटी शेपूट घातल्याचे दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

चिखलीतील संतपीठाच्या निविदा प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप होत असतानाच जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या उद्योगनगरीला कलंक लागत असल्याचा ठपका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपवर ठेवला. भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करून भोसरीचे आमदार दुकान थाटणार असून हे कदापी शक्य होऊ देणार नाही, अशी भूमिकाही साने यांनी घेतली आहे. सर्वसाधारण सभेत या दोन्ही विषयांवरून जोरदार वादंग झाले. हे विषय चर्चेसाठी समोर येताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन सभागृहाची दिशा बदलली. या गोंदळाचा फायदा घेऊन महापौर राहूल जाधव यांनी संतपीठ आणि भोसरी रुग्णालय खासगीकरण संबंधीत गंभीर विषयांना घाईघाईत मंजुरी दिली. त्यावर चर्चा करण्यासाठी अतुरता घेऊन बसलेल्या सुज्ञ नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली नाही. भोसरी रुग्णालय शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असताना त्याच्या खासगीकरणावर मात्र शिवसेना सभागृहामध्ये शांत राहिली. त्यामुळे शिवसेनेची मूळ भूमिका भाजपला सावरून घेण्याचीच होती, असा संशय व्यक्त केला जात आहे.

अनधिकृत बांधकामे किंवा शास्ती कराच्या मुद्यावरून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेते राहूल कलाटे यांच्यासह पदाधिका-यांनी नेहमी नागरिकांच्या बाजुने आवाज उठविला आहे. खासदार बारणे यांनी शास्ती कराच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. आमदार चाबुकस्वार यांनी देखील जोपर्यंत शहरात वाढलेल्या झोपडपट्ट्यांचे निर्मुलन होत नाही, तोपर्यंत पिंपरी-चिंचवड स्मार्ट होणार नाही, अशीच भूमिका मंत्रीमंडळात मांडली आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांवर शिवसेना भाजप विरोधात उभी राहिल्याचे दिसते. मात्र, संतपीठाची वादग्रस्त निविदा, भोसरी रुग्णालय खासगीकरण आणि पीएमपीएमएल बस खरेदीच्या विषयावरून या खासदार, आमदारांसह पालिकेतील पदाधिका-यांच्या कंठातून विरोधाचा साधा सूर देखील निघाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वाघांनी शेपूट घातल्याचा प्रत्यय या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने आला आहे.

भाजप नेत्यांच्या मित्रत्वापोटी मवाळ धोरण

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. युती झाली तरच आपली डाळ शिजू शकते, अन्यथा राजकीय मैदान जड जाणार, हे दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार जाणून आहेत. त्यातच वेगवेगळ्या पक्षात राहूनही विरोधाचा नारा देऊन अंतर्गत मैत्री जपण्यापोटी मागार घेणा-यांची संख्या देखील या पक्षामध्ये आहे. त्यामुळेच शिवसैनिकांनी मैत्रीपोटी विरोधक म्हणून नेतृत्व करणा-या राष्ट्रवादीला तोंडावर पाडले. आता तर युती होण्याची अपेक्षा बाळगल्याने शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी सुध्दा भाजप विरोधात बोलणे सोयीस्करपणे टाळले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button