breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दंगलीशिवाय सरकार सत्तेवर येऊ शकत नाही – प्रकाश आंबेडकर

पुणे – केंद्रातील भाजप सरकारचा प्रवास हा विकासाच्या मुद्‌द्‌यापासून अयोध्येपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्षांच्या माध्यमातून राम मंदिर बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याच मुद्यावरून दंगल घडवायची आणि त्यातून समाजामध्ये भय निर्माण करून पुन्हा केंद्रात सत्ता मिळवायची, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच अयोध्या प्रश्‍नावरून देशात दंगली घडविण्यात येतील. कारण, दंगली घडविल्याशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येऊच शकत नसल्याचे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी व्यक्त केले.

राज्यातील बहुजन, दलित, मुस्लिम, भटके-विमुक्त आणि इतर मागासवर्गीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. त्या आघाडीचे महाअधिवेशन आणि संविधान सन्मान सभेचे आयोजन पुण्यात केले होते. या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, आमदार बळिराम सिरस्कर, माजी आमदार लक्ष्मण माने, विजय मोरे, हरिदास भदे, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, प्रा. किसन चव्हाण, प्रा. हमराज उईके, अमित भुईगळ, शहराध्यक्ष अतुल बहुले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. त्यानंतर भारतातील नागरिकांना जुन्या नोटा बदलण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली; पण त्याचवेळी अनिवासी भारतीयांना 31 मेपर्यंत मुदत दिली. ही मुदत देण्यामागे भाजपचा नफा कमविण्याचा उद्देश होता. कारण, या नोटा 40 टक्के कमिशन घेऊन बदलून देण्यात आल्या. सरकारने दिलेल्या मुदतीत नागरिकांनी सर्व जुन्या नोटा जमा केल्या. तरीही किती नोटा जमा झाल्या, याचा हिशेब दिला जात नाही. मग हा हिशेब का दिला जात नाही. यामागची सरकारची भूमिका कॉंग्रेसलाही माहीत आहे. कारण, यामध्ये कॉंग्रेस आणि भाजपची मिलीभगत होती. या दोन पक्षांचे नाते मला माहीत आहे. देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे मतदान होऊन जाऊद्या. त्यानंतर कॉंग्रेस आणि भाजपमधील या गुप्त नात्याचा पर्दाफाश करू, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

बहुजन, दलित आणि मुस्लिम एकत्र आल्यास राज्यातील भाजपची सत्ता जाऊन वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल. या परिवर्तनामुळे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर राज्याचे मुख्यमंत्री बनतील, असा विश्‍वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एमआयएम हा आंबेडकर यांच्यासोबत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अधिवेशनात एमआयमचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या समारंभात आंबेडकर यांना मौलाना आझाद सद्‌भावना पुरस्काराने गौरविण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button