breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

डेंग्यू , मलेरियामुळे दोघांचा मृत्यू ; लेप्टोच्या बळींची संख्या नऊ

मुंबई : डेंग्यूमुळे आणि मलेरियामुळे दोन रुग्ण दगावले आहेत. या वर्षीच्या पावसाळ्यातील या पहिल्याच घटना असल्या तरी आतापर्यंत डेंग्यूचे अडीच हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळले असल्याने लेप्टोसोबत डेंग्यूचीही साथ वेगाने पसरत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाने मृत झालेल्या रुग्णांची संख्या मागील दोन महिन्यांमध्ये नऊवर पोहोचली असून गतवर्षीपेक्षा रुग्णांची संख्या वाढली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत लेप्टोच्या रुग्णांची संख्या ११८ होती. या वेळेस मात्र ही संख्या १३० पर्यंत गेली असून आत्तापर्यंत ९ जण दगावले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात चेंबूर येथील टिळकनगर भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. संबंधित रुग्णाला साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी क्षयरोग झाला होता आणि व्यसनाच्या आहारी गेलेला होता. ४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर टिळकनगरमधील ५०० घरांची तपासणी केली असून तिथे लेप्टोचे आणखी पाच संशयित रुग्ण आढळले.

कुल्र्यातील अशोकनगर भागातील ३७ वर्षीय महिलेचा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाला. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची या पावसाळ्यातील ही पहिलीच घटना असून त्यानंतर अशोकनगर भागातील सुमारे ५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पाण्याच्या सहा टाक्यांमध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या दिसून आल्या. तपासणीदरम्यान डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले असून त्यांना पुढील उपचारांसाठी पालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. वरळी कोळीवाडा भागातील ५२ वर्षांच्या व्यक्तीचा मलेरियामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मृत्यू झाला. या पावसाच्या काळातील मलेरियामुळे झालेला पहिलाच मृत्यू आहे. घरकाम करणारी ही व्यक्ती जुलैच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये अलिबाग येथे गेली होती. तेथून आल्यानंतर ताप आल्याने जवळील डॉक्टरांकडून औषधउपचार सुरू होते. मात्र ताप कमी न झाल्याने जवळील पालिका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी गेल्यानंतर मलेरिया असल्याचे निष्पन्न झाले. आठवडाभरात प्रकृती गंभीर झाल्याने त्यांचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या घटनेनंतर कोळीवाडा भागातील ५३९ घरांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये तापाचे तीन रुग्ण आढळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button