breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे यांना दे धक्का, मावळ मतदार संघ ‘भाजप’कडेच राहणार

  • मुख्यमंत्र्यांनी पुण्यात केले सुतोवाच
  • भाजप नगरसेवकांनी व्यक्त केला संताप
  • मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मांडली मते

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली असली तरी जागा राखून ठेवण्याबाबत भाजपमध्ये संदोपसुंदी कायम आहे. मावळ मतदार संघ शिवसेनेला सोडण्यावरून पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला आहे. मावळ मतदार संघ भाजपकडेच ठेवण्यात यावा, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी सज्जड मागणी या नगरसेवकांनी केली आहे. त्यावर कोणत्याही परिस्थितीत मावळातून भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी नगरसेवकांना दिला आहे.

काल रात्री शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. युतीमुळे एकीकडे समाधान व्यक्त केले जात असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप नगरसेवकांनी त्रागा व्यक्त केला आहे. कारण, युती होऊनही भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मावळ मतदार संघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. मुळात मावळ मतदार संघ शिवसेनेकडे आहे. आगामी निवडणुकीत विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना सेनेची उमेदवारी असणार आहे. बारणे यांच्याविषयी मनात कितीही विरोध असला तरी युतीच्या प्रतिष्ठेपाई भाजपच्या नगरसेवकांना त्यांचे काम करावेच लागणार आहे.

ही नामुष्की पत्करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींकडे थेट विरोध दर्षविलेला बरा म्हणून पिंपरी-चिंचवडमधील भाजप नगरसेवकांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खासदार बारणे यांना विरोध असल्याचे पत्र दिले. त्यावर आज याच नगरसेवकांना पुण्यातील एका कृषी महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. हा मतदार संघ भाजपकडेच ठेवावा, अन्यथा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करणार नाही. विशेषतः खासदार बारणे यांचे काम कदापी केले जाणार नाही, अशी मते मांडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील नगरसेवकांनी बारणे यांच्या ऐवजी सेनेचा दुसरा कोणताही उमेदवार चालेल. परंतु, बारणे यांचे काम कदापी करणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मावळ मतदार संघ भाजपकडे राखून ठेवण्यात नगरसेवक किती यशस्वी ठरतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

  • तथापि, मावळ मतदार संघ भाजपकडेच राहील. त्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने  कामाला लागणे गरजेचे आहे. मावळ मतदार संघातून भाजपचाच उमेदवार निवडून येईल, यावर आपला विश्वास आहे. त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्टींच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती भाजपच्या एका नगरसेवकाने सांगितली. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, शितल शिंदे, अभिषेक बारणे, तुषार कामठे, तुषार हिंगे, सुरेश चिंचवडे, कैलास बारणे, नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, उषा मुंढे, माधुरी कुलकर्णी, माया बारणे, अर्चना बारणे, शर्मिला बाबर आदी नगरसेवक उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button