breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अंतर्वस्त्र तयार करणाऱ्या कंपनीचे मालक हर्षद ठक्कर बेपत्ता

नाइटवेअर आणि लाँजरी तयार करणाऱ्या आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. कार्यालयातून निघण्यापूर्वी ठक्कर यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या कारस्थानामुळे कंपनीच्या शेअर्सच्या मुल्यात घसरण झाल्याचा आरोप केला आहे.

आशापुरा इन्टिमेट्स फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे २ ऑक्टोबररोजी कार्यालयातून निघाले होते. मात्र, त्यानंतर ठक्कर यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. शेवटी ठक्कर कुटुंबीयांनी दादर पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली. ८ ऑक्टोबररोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार दादरमधील कार्यालयात ठक्कर शेवटचे दिसले होते. निघण्यापूर्वी त्यांनी मोबाईल, पाकिट आणि पासपोर्ट कार्यालयात ठेवून दिले. यासोबत त्यांनी एक चिठ्ठीदेखील ठेवली होती. यात ठक्कर म्हणतात, कंपनीच्या शेअर्ससाठी मी माझी संपत्ती गहाण ठेवली आहे. पण हे पुरेसे नाही. शेअर मार्केटमधील काही लोक कंपनीविरोधात काम करत आहे. यामुळेच कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला कोणाकडूनही काहीच नको आहे. माझं काय होईल याची मला कल्पना नाही. पण मला सर्वांनी माफ करावे. अनेक गुंतवणूकदारांच्या नुकसानासाठी मी कारणीभूत आहे हे मला सहन होत नाही. मी कधीही कोणाची फसवणूक केलेली नाही. माझ्या विम्यातून येणारी रक्कम कंपनीला द्यावी, असे त्यांनी यात म्हटले आहे. गुजराती भाषेत ही चिठ्ठी लिहिण्यात आली आहे.

‘आशापूरा’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीची कामगिरी चांगली होती. २०१७ – १८ या वर्षात कंपनीची उलाढाल ३८४ कोटींपर्यंत पोहोचली होती. कंपनीचा नफा ६२ कोटींपर्यंत पोहोचला होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा ४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, गेल्या महिनाभरात शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्सचे मूल्य घसरले होते. सप्टेंबरमधील शेवटच्या पंधरा दिवसात कंपनीच्या एका शेअर्सचे मूल्य ४४५ रुपयांवरुन ३५० रुपयांवर घसरले होते. तर शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सचे मूल्य १२५ रुपये इतके होते.

दादर पोलीस हर्षद ठक्कर यांचा शोध घेत आहे. ठक्कर कुटुंबीय, नातेवाईक, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांकडे चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्ह येथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे समजते. ठक्कर कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button