breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

माहितीअभावी दत्ताकाकांची मेहनत वाया; प्रशासनाची माहिती देण्यास टाळाटाळ

पिंपरी – महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामांचा खरपूस समाचार घेऊन नागरिकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने यांनी कंबर कसली आहे. मात्र, त्यांना प्रशासनाकडून आपेक्षित माहिती मिळत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोध झुगारून मोठ्या कष्टाने विरोधी पक्षनेता हे पद मिळवले असताना माहिती वेळेत मिळत नसल्याने “काकां”ची मेहनत वाया जाऊ लागली आहे. त्यांच्याप्रती सहकार्याची भूमिका न घेता केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

राष्ट्रवादीने सलग पंधरा वर्षे महापालिकेतील सत्तेचा उपभोग घेतला आहे. दुर्दैवाने गेल्यावर्षी पालिका निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीलाविरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. मात्र, सत्ताधा-यांच्या अंगी विरोधकाचा गुण नसल्यामुळे मोठी पंचाईत झाली. गेल्या वर्षी माजी विरोधी पक्षनेते पदाचा मान योगेश बहल यांना मिळाला. मात्र, त्यांनी भाजप पदाधिका-यांवर नावालाच आरोप करण्याशिवाय इतर काहीही केले नाही. ताडपत्री भ्रष्टाचार, सभाशास्त्राचा अवमान, शास्ती कराचा फसवा निर्णय, अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अशा त्याच-त्या विषयांना घेऊन सत्ताधा-यांवर आरोप करून चर्चेत राहण्यासाठी खटाटोप केला. मात्र, एखाद्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत एकही विषय बहल यांनी तडीस नेला नाही. त्यामुळे त्यांचे सत्ताधा-यांसोबत साटेलोटे होती की काय?, असा प्रश्न होता.

 

दत्ता साने यांनीही विरोधी पक्षनेते पदासाठी बहल यांच्या नावाला नापसंती दर्शविली होती. त्याबाबत राष्ट्रवादीचे कारभारी अजित “दादा” पवार यांच्याकडे “काकां”नी थेट तक्रार केली होती. मात्र, “दादां”नी बहल यांच्यावर “अँक्शन” घेतली नाही. त्यामुळे “काकां”चा जळफळाट होत होता. विरोधी पक्षनेता हे पद आपल्याला मिळावे यासाठी “काकां”नी सुरूवातीपासून “दादां”कडे दगादा लावला होता. मात्र, त्यांना पहिल्या वर्षी डावलण्यात आले. आता दुस-या वर्षी त्यांना ही संधी मिळाली आहे. त्यातही चिंचवड विधानसभेचे दावेदार विठ्ठल “नाना” काटे यांचा नाराजी “काकां”ना पत्करावी लागली. पद मिळताच “काकां”नी सत्ताधारी भाजपच्या विरोधातील छोटी-मोठी प्रकरणे काढून “स्टंट”बाजी केली. भूमिपूजनाची चुकीची निमंत्रण पत्रिका, पालिकेतील दुषीत पाणी पुरवठा, जलपर्णी या विषयांना घेऊन प्रशासनाला त्यांनी “टार्गेट” केले. मात्र,महत्वाच्या विषयांची माहिती मागूनही प्रशासन ती देत नसल्याने साने यांची व्युहरचना “फेल” ठरत असल्याची खंत त्यांना सतावू लागली आहे.

 

या विषयांची माहिती देण्यास प्रशासनाची टाळाटाळ…

–    मे महिन्यातील महासभेचे सर्व विषय

–    पर्यावरण निविदा नोटीस

–    नगरसचिव विभागात स्थापत्यविषयक कामे

–    अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांचे वार्षिक मोबाईल शूल्क

–    पुणे मेट्रे मार्गात कत्तल केलेल्या झाडांची संख्या

–    बहिणाबाई चौधरी उद्यानातील प्राण्यांची संख्या

–    कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतीक समितीमार्फत निधीचे वाटप

–    राजन पाटील यांच्या पदाबाबत

–    पालिका अस्थापनेवरील रिक्त पदे

–    जाहीरात फलक, फ्लेक्स

–    संभाजीनगर भाजीमंडई

–    शास्ती कर

कित्येक विषयांची माहिती प्राप्त करण्यासाठी प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला. मात्र, अधिकारी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. पुढील विषयांची यादी तयार आहे. तत्पुर्वी हाती घेतलेली एकेक प्रकरणे तडीस नेऊन त्यानंतर उर्वरीत विषयांची माहिती मागवणार आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका आपेक्षित आहे.

– दत्ता साने, विरोधी पक्षनेता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button