कपिल पाटीलांचा पराभव जिव्हारी, भाजपच्या कार्यकर्त्याची आत्महत्या
![Youth committed suicide due to depression caused by Kapil Patil's defeat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Kapil-Patil-780x470.jpg)
मुंबई | भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला आहे. कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी (वय-३५) या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
संजय अधिकारीची शहापूर तालुक्यात भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख होती. एका पायाने अपंग असुनही त्यांची पक्ष कार्यासाठीची धडपड कौतुकास्पद होती. कपील पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचाराचे काम केले होते. मात्र, कपील पाटील पराभूत झाल्याची माहिती मिळताच, संजय खूप व्यथित झाले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडचे दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
रात्रीच्या वेळेत मित्रांसोबत चर्चा करत असताना आता जगण्यात काही अर्थ नाही, अशी भाषा त्यांनी केली होती. मित्रांनी त्यांना समजावले होते. असे टोकाचे पाऊन न उचलण्याचे सूचित केले होते. बुधवारी रात्री पत्नी, त्याची दोन मुले घरात झोपी गेल्यानंतर संजयने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीला आला. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची माहिती मिळताच कपिल पाटील यांचे कौटुंबिक सदस्य देवेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संजय यांच्या कुटुंबीयांना कपील पाटील फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाणार आहे.