गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी l प्रतिनिधी
दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 44 हजारांचा गुटखा आणि एक दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) रात्री साडेआठ वाजता करण्यात आली.
राजू हेमराज माळी (वय 26, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजू याने शाहू (रा. वाघोली) या व्यक्तीकडून गुटखा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे शाहू या व्यक्ती विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना माहिती मिळाली कि, एक तरुण दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी रहाटणी फाटा येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन राजू माळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 44 हजार 514 रुपयांचा गुटखा आणि 60 हजारांची एक दुचाकी जप्त केली. याप्रकरणी पोलीस नाईक वासुदेव मुंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.