breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

पराभव दिसू लागल्याने भाजप गुंडगिरीवर उतरली: आ. रोहित पवार

पिंपरी: देशातील लोकशाहीची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय सामान्य मतदारांनी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नाना काटे यांचा विजय निश्चित आहे. भाजपला पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागली आहे. शिवसेनेच्या शहराध्यक्षांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे. तरी पण सामन्य जनतेनेच काटे यांना विजयी करण्याचा केलेला निर्धार या पदयात्रेत जाणवत आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ किवळे गावठाण, मामुर्डी, आदर्शनगर, विकासनगर, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी भागात रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. शेकडो तरूण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक प्रज्ञा खानोलकर, सुमनताई नेटके, बापू कातळे, मनोज खानोलकर प्रशांत सपकाळ, संजय कातळे, कामेश तरस, लाला चिंचवडे, धनंजय वाल्हेकर, विनोद कांबळे, सचिन सकाटे, अमोल पाटील, इमरान शेख आदी नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नागरिक उत्स्फूर्तपणे या पदयात्रेत सहभागी होत नाना काटे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधत रोहित पवार यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पवार म्हणाले, या भागात असणाऱ्या पाण्याची समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन त्याचे नियोजन करण्यात येईल.

भारतीय जनता पक्षाने या मूलभुत समस्येचेही राजकारण केले. पवना धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला त्या पक्षाने विरोध केला. ही योजना पूर्णत्वास जाऊ नये, असे प्रयत्न केले. सामान्यांच्या हालअपेष्टांची कोणतीही जाणीव नसणाऱ्या या पक्षाला पराभूत करण्याचा चंग नागरिकांनी बांधला आहे, असे पवार म्हणाले.

तरूण रस्त्यावर उतरतात, त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष जाणवत असतो. आज तरूणाईने नाना काटे यांचा विजय करण्याचा निर्धार केला आहे. पक्ष कोणताही असो, त्यांचा नेता कोणताही आदेश देवो, आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कायम स्वरूपी राहणार आहोत, असे अनेक तरूणांनी मला प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे, त्यामुळे नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरच रेघ आहे, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button