TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का दुप्पट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. मात्र ८८ हजार मतदारांपैकी केवळ २३ हजार ८६६ मतदारांनीच मतदान केले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात तसेच शांततापूर्ण आणि शिस्तीच्या वातावरणात पार पडल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर मतदारांमधून एकूण दहा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ही निवडणूक झाली. यंदाच्या निवडणुकीला पहिल्यांदाच राजकीय स्वरुप आले होते. भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा आदी राजकीय पक्ष-संघटनांचे एकूण ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदानासाठी रविवारी विद्यापीठ प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले होते. मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यावर दुपारपासून मतदानाने वेग घेतला. तरुण विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांनीही या मतदानाला हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला.

अधिसभेच्या पदवीधरांसाठीच्या निवडणुका आज ७१ मतदान केंद्रांवर अतिशय शांततेत पार पडल्या. सर्व केंद्रप्रमुख, त्यांच्या संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाचे शिक्षक-अधिकारी-कर्मचारी यांनी या निवडणुका यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

मतदान टक्केवारी

पुणे- २४.८५, अहमदनगर- २४.३, नाशिक- ३७.१४

मंगळवारी निकाल

विद्यापीठाकडून मंगळवारी मतमोजणी करण्यात येेेणार आहे. त्यानंतर ३७ उमेदवारांपैकी कोणाला अधिसभेवर जाण्याची संधी मिळणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

नेतेही मैदानात..

पदवीधर निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी राजकीय नेतेही मैदानात उतरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे-पाटील, प्रशांत जगताप, भाजपकडून गणेश बीडकर, राजेश पांडे, राघवेंद्र मानकर यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवकांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाची पाहणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button