सांगलीत गजबजलेल्या रस्त्यात तरुणावर धारदार शस्त्रांनी वार; जागीच मृत्यू
![Young man attacked with sharp weapons on a busy road in Sangli; Death on the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Young-man-attacked-with-sharp-weapons-on-a-busy-road-in-Sangli-Death-on-the-spot.jpg)
सांगली : रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला आहे. संतोष पवार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाची हत्या करत तो चालवत असलेल्या गाड्याचीही तोडफोड केली आहे. गजबजलेल्या शंभर फुटी रोडवर घडलेल्या हत्येच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विश्रामबाग शंभर फुटी रोडवर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ संतोष पवार हा अंडा भुर्जीचा व्यवसाय करत होता. छोट्या चारचाकी गाडीमधून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी संतोष पवार याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात संतोष हा जागीच ठार झाला.
संतोषची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या चारचाकी गाडीचीही तोडफोड करत साहित्य रस्त्यावर फेकून दिलं आणि ते पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
दरम्यान, गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या खुनाच्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.