सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगणार?; राज्यात घरांच्या किमती महागणार
![Will the dream of a common man's house be shattered ?; Housing prices will go up in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/ready-reaknar.jpg)
रेडीरेकनरच्या दरामध्ये सरासरी पाच टक्के वाढ
प्रतिनिधी, पुणेः करोनामुळे आर्थिक संकट उभे राहिले असताना, राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने यंदा राज्यात बाजार मूल्यामध्ये (रेडीरेकनर) सरासरी पाच टक्के वाढ केली. त्यामुळे घरे आणि जमिनीच्या किमती आवाक्याबाहेर जाणार असल्याने नागरिकांच्या स्वप्नांतील घरांना ‘घरघर’ लागली आहे. राज्यात महापालिका क्षेत्रात सरासरी ८.८० टक्के वाढ करतानाच ग्रामीण भागात सरासरी ६.९६ टक्के आणि शहरालगतच्या नव्याने विकासित होणाऱ्या परिसरात (प्रभाव क्षेत्र) ३.९० टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आजपासून (१ एप्रिल) दरवाढ लागू झाली आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत नवीन दर जाहीर केले. करोनामुळे गेल्या वर्षी रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी घरे महाग होणार आहेत.
पुणे जिल्ह्यात सरासरी ८.१५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या मूळ हद्दीत ६.१२ टक्के, तर २३ समाविष्ट गावांमध्ये १०.१५ टक्के वाढ करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रांमध्ये सर्वाधिक १३.१२ टक्के दरवाढ मालेगाव महापालिकेत झाली आहे. दुसऱ्या स्थानावर औरंगाबाद महापालिका आहे. या महापालिकेत १२.३८ टक्के वाढ झाली असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२.३६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर नाशिक महापालिका असून, या महापालिकेत १२.१५ टक्के दरवाढ झाली आहे. पाचव्या स्थानावर लातूर महापालिका असून, ११.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र दर असून, या परिसरासाठीही सरासरी २.३४ टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबई शहर ०.८४ टक्के आणि मुंबई उपनगरात ३.८३ टक्के वाढ केली आहे.
मेट्रो अधिभार आजपासून लागू
‘मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिका; तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात आजपासून (१ एप्रिल) एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना एक टक्का जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.