सोनिया, राहुल यांना आजच ईडीचे समन्स का?; पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं कारण
![Why Sonia, Rahul summoned by ED today ?; Prithviraj Chavan said because](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Prithviraj-Chavan-said-because.jpg)
अहमदनगर : नॅशनल हेरॉल्डसंबंधी सुरू असलेल्या जुन्या प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इडीने समन्स बजावलं आहे. यामागे राजकीय कारण असल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना केला. चव्हाण म्हणाले की, ‘आज एकाचवेळी देशातील सर्व राज्यांत काँग्रेसच्या नवसंकल्प कार्याशाळा सुरू आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करून हेडलाइन्स मिळविण्यासाठी भाजपच्या सरकारने जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यास यंत्रणेला भाग पाडले आहे,’ असा आरोप चव्हाण यांनी केला.
या प्रकरणाची फाईल सक्तवसुली संचलनालयाने २०१५ मध्ये बंद केली होती. त्यानंतर आज पुन्हा सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यावरून आता काँग्रेसमधून टीका सुरू झाली आहे.
शिर्डीतही प्रदेश काँग्रेसची कार्यशाळा सुरू आहे. तेथे चव्हाण यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर नॅशनल हेरॉल्डला मदत करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली होती. पुढे भाजपचे सरकार आल्यावर हे प्रकरण उकरून काढण्यात आले. यामध्ये सोनिया आणि राहुल यांना अटक आणि जामीनही झाला आहे. मधल्या काळात सात-आठ वर्षे यात काहीही झाले नाही. मात्र, तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास देण्याची भाजपची कार्यपद्धती आहे. त्यानुसार त्यांनी नेमकी आजची वेळ यासाठी निवडली.’
‘आज देशभर काँग्रेसच्या कार्यशाळा सुरू आहेत. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, विरोधी नेतृत्वाला त्रास देण्यासाठी भाजपने यंत्रणांना हाताशी धरून ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. यामध्ये जर तपास यंत्रणांना काही नवी माहिती मिळाली होती, तर एवढीच वर्षे वाट का पाहिली? आजचा दिवस यासाठी का निवडला? मात्र, अशा प्रकारांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. आम्ही याविरोधात संघर्ष करू. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार १५ जूनला आमचे आंदोलन होणार आहे. त्यामध्ये हाही विषय उपस्थित केला जाणार आहे. भाजपचे हे सूडाचे राजकारण कदापि सहन केले जाणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसचा स्वत:चा मीडिया असावा
आज शिर्डीत सुरू असलेल्या नवसंकल्प कार्यशाळेतील चर्चेची माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, यावेळी एका विषयाच्या गटाकडून काँग्रेस पक्षाचा स्वत:चा मीडिया असावा, अशी सूचना पुढे आली आहे. सध्या भाजपने बहुतांश मीडियावर विविध पद्धतीने ताबा मिळवून त्यांची मुस्कटदाबी केली आहे. याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडेही हक्काचा मीडिया असावा, अशी ही सूचना आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.