विद्याधर अनास्कर हेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर प्रशासक राहतील : उपमुख्यमंत्री अजित पवार
![Vidyadhar Anaskar will be the administrator of Maharashtra State Co-operative Bank: Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Pune-News-विद्याधर-अनास्कर-हेच-महाराष्ट्र-राज्य-सहकारी-बँकेवर-प्रशासक.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची निवडणूक ही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेता येत नाही. विद्यमान प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे काम पारदर्शी आहे. त्यामुळे प्रशासक बदलण्याची गरज नसून अनास्कर हेच प्रशासक म्हणून राहतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्य बँकेच्या निवडणुकीबाबत नुकत्याच्या पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘राज्य बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. परंतु, या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिकांची एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
विद्याधर अनास्कर हे कोणत्या राजकीय व्यक्तीचे नातेवाईक नाहीत. तसेच, त्यांच्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही. अनास्कर यांची नेमणूक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने त्यांना प्रशासकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मार्च 2022 अखेर आर्थिक वर्षात बॅंकेला सातशे कोटींचा ढोबळ नफा तर, चारशे कोटींचा निव्वळ नफा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.