गोवा आणि दमणमध्ये तयार होणाऱ्या मात्र महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध कंपन्यांची बनावट दारू तयार करून ती विक्री करणाऱ्या दोघा जण ताब्यात
![Two persons who were manufacturing and selling fake liquor of various companies which are manufactured in Goa and Daman but banned in Maharashtra have been arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Two-persons-who-were-manufacturing-and-selling-fake-liquor-of-various-companies-which-are-manufactured-in-Goa-and-Daman-but-banned-in-Maharashtra-have-been-arrested.jpg)
अहमदनगरः गोवा आणि दमणमध्ये तयार होणाऱ्या मात्र महाराष्ट्रात बंदी असलेल्या विविध कंपन्यांची बनावट दारू तयार करून ती विक्री करणाऱ्या दोघा जणांना संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात ९ लाख २९ हजार रुपये किमतीचा बनावट दारू साठा जप्त करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. डी. वाजे आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील रायतेवाडी शिवारात हा छापा टाकला. त्यावेळी विविध कंपन्यांची बनावट दारू चक्क घरात बनवली जात होती. रिकाम्या बाटल्यांमध्ये ही दारू भरत असताना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दोघा जणांना रंगेहात पकडले आहे. या बाटल्यांना नकली बुचे लावून बनावट दारू विक्रीचा हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू होता. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी हा छापा टाकत ४० बॉक्समध्ये बनावट दारूने भरलेल्या ६८७ सीलबंद बाटल्या ४० तसेच ७५०० बनावट बाटल्यांचे बूच असा ९ लाख २९ हजार रुपये किमतीचा साठा तसेच एक कार जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी चैतन्य सुभाष मंडलिक आणि सुरेश मनोज कालडा, राहाणार संगमनेर, या दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी गजाआड केले. यातील चैतन्य मंडलिक याच्या घरात हा बनावट दारू तयार करण्याचा हा उद्योग सुरू होता. ही दारू संगमनेर, अकोले तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विक्री केली जात होती. सुरेश कालडा याची संगमनेर आणि अकोले तालुक्यात परमिटची दुकाने असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईने पांगरमल बनावट दारूकांडाच्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाल्याने दारू पिणाऱ्यानी चांगलीच धस्ती घेतली आहे.