आईच्या वैद्यकीय उपचारासाठी महिला आमदारांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
![Two arrested for financial fraud by calling women MLAs for mother's medical treatment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Two-arrested-for-financial-fraud-by-calling-women-MLAs-for-mothers-medical-treatment.jpg)
पुणेः आईच्या वैद्यकीय उपचारासाठी महिला आमदारांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली. यातील तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असून, तो मूळचा बुलढाणा येथील आहे. तरुणासह बँकखात्यावर रक्कम स्वीकारणाऱ्या तरुणीचाही यामध्ये समावेश आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आमदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
मुकेश अशोक राठोड ( वय २३ रा. वसंतनगर, ता. लोणार) याच्यासह तरुणीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या मुलीने फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मिसाळ यांच्याशी १२ जुलैला फोनद्वारे संपर्क साधून आईला बाणेरमधील रुग्णालयात दाखल केल्याने उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. मिसाळ यांनी ‘गुगल पे’द्वारे आरोपीला ३,४०० रुपये पाठवले. प्रा. आमदार देवयानी फरांदे, मेघना साकोरे-बोर्डीकर, श्वेता महाले यांच्या बाबतीतही हा प्रकार घडल्याचे मिसाळ यांच्या लक्षात आले. त्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी औरंगाबादमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने तरुण-तरुणीला अटक केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे उपस्थित होते.
आरोपीने पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिली आहे. तरुणीने बी. एस्सी.ची पदवी घेतली आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना त्यांची ओळख झाली होती. आमदार माधुरी मिसाळ यांच्या भेटीत त्यांचा मोबाइल क्रमांक आरोपींना मिळाला होता. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे पाऊल उचलले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक विवेक मिसाळ, संतोष पाटील, गणेश दुधाते, श्यामराव लोहमकर, संतोष जाधव, सतीश मोरे, अतुल महांगडे, तानाजी सागर, शिवाजी येवले, राहुल शेलार, अभिषेक धुमाळ, पंचशिला गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.