महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शेजारी असलेल्या ब्लूमिंग डेल हायस्कूलच्या शेजारील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा; विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवलं
![There are also big cracks in the mountain next to Blooming Dale High School in Panchgani neighborhood of Mahabaleshwar taluk; The students were moved to a safe place](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/There-are-also-big-cracks-in-the-mountain-next-to-Blooming-Dale-High-School-in-Panchgani-neighborhood-of-Mahabaleshwar-taluk-The-students-were-moved-to-a-safe-place.jpg)
सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये दुर्घटना घडत आहेत. दरड कोसळून रस्ते ठप्प होण्यासह काही ठिकाणी जमिनीला भेगा पडत असल्याचं समोर आलं होतं. अशातच महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी शेजारी असलेल्या ब्लूमिंग डेल हायस्कूलच्या शेजारील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा पडल्या असून या शाळेच्या इमारतीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
शाळेजवळील डोंगराला भेगा पडल्याचं लक्षात येताच काल सायंकाळी महसूल विभागाने या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला. तसंच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे असे आदेश तातडीने देण्यात आले आहेत. हा परिसर पाचगणीपासून केवळ १ किलोमीटर अंतरावर असून तिथं भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सदर डोंगर अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खचला आहे, तर डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला आणि विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, सध्या पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यात येत आहेत.