ओमानच्या समुद्रात जतचे तिघेजण गेले वाहून; अभियंता पित्यासह दोन मुलांचा समावेश
![The three were swept away in the sea of Oman; The engineer father consists of two children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-three-were-swept-away-in-the-sea-of-Oman-The-engineer-father-consists-of-two-children.jpg)
सांगली :ओमान देशातील समुद्रामध्ये जतमधील तिघे जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे. मूळचे जत येथील रहिवासी असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन मुले, असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा प्रकार ओमान येथे घडला. या घटनेमुळे जतमध्ये शोककळा पसरली आहे.
जत येथील प्रसिद्ध वकील राजकुमार म्हमाणे यांचे अभियंता असणारे बंधू शशिकांत उर्फ विजय म्हमाणे हे संयुक्त अरब अमिरात येथील येथे एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी व तीन मुलांच्यासह त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. रविवारी ईदेची सुट्टी असल्याने ते आपले कुटुंब व मित्रांसमवेत ओमान या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी बनवून,आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता.
त्यानंतर ते ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले असता, त्या ठिकाणी प्रचंड अशा लाटा उसळत होत्या. त्याचा व्हिडिओ सुरु असताना एक प्रचंड मोठी लाट आली. या लाटेत काहीजण समुद्रात ओढले गेले.
या दुर्घटनेत शशिकांत म्हमाणे, त्यांचा मुलगा श्रेयस आणि श्रुती हे तिघेजण यामध्ये वाहून गेले आहेत. तर पत्नी सारिका व एक मुलगी बचावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शशिकांत म्हमाणे यांचे बंधू राजाराम म्हमाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते तातडीने दुबईला गेल्याचे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेबाबत म्हमाणे कुटुंबाकडून दुजारो देण्यात आला आहे.