Uncategorizedताज्या घडामोडी

ओटीपीचा फंडा झाला जुना; चोरटे घेताहेत ‘अॅक्सेस’, फसवणुकीचा हा ट्रॅक समजून घ्या

नाशिकः घरफोडी, जबरी चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांची पद्धत ज्याप्रमाणे बदलत आहे, अगदी त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारांनीही आता आपला ट्रॅक बदलत नवा फंडा शोधून काढला आहे. यापूर्वी एखाद्याला फोन करुन ‘ओटीपी’च्या सहाय्याने त्याच्या खात्यातून पैसे लांबविले जात असत. आता मात्र संबंधितांचा मोबाइल ‘अॅक्सेस’ घेत संपूर्ण गोपनीय माहिती संकलित करून त्याद्वारे अवघ्या काही मिनिटांत बँक खात्यांतून पैसे वळते केले जात आहेत. यामध्ये सुशिक्षितांनाही गंडा घातला जात असून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हेगारीची पद्धत बदलल्याचे अधोरेखित होत आहे.

वीजबिल भरले नाही, असे मेसेज अथवा फोन करून गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे, तुमचे कुरिअर पोहोचले नाही म्हणून रि-कॉल करा, असेही सांगितले जाते. यावेळी बँकेसह क्रेडीट व एटीएम कार्डची माहिती संकलित केली जाते. यानंतर सायबर गुन्हेगार ई-बँकिंगद्वारे पैसे काढून घेतात. या पद्धतीचे २०२२ मध्ये आतापर्यंत अकरा गुन्हे घडले आहेत.

यांना करतात टार्गेट
बँक खात्यात सर्वाधिक शिल्लक असणाऱ्यांना सायबर गुन्हेगार ‘टार्गेट’ करतात. यामध्ये व्यावसायिक, उद्योजक आणि तरुणांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. यापाठोपाठ निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे. नाशिकमध्ये शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नेट बँकिंग आणि विविध अॅप्सचा वापर करतात. त्यांना गंडा घातल्याचे प्रकार उघड झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘सायबर गस्त’ वाढविली असून, वेळोवेळी ग्राहकांना सूचित करण्यात येत आहे.

मुदत ठेवही मोडली
दीड महिन्यांपूर्वी बीएसएनएलमधील निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी फसविले. त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठवून अॅक्सेस घेतला. यानंतर नेट बँकिंगची माहिती संकलित केली. टप्प्याटप्प्याने व्यवहार करून मोबाइल अॅक्सेसद्वारे थेट बँकेतील मुदत ठेवदेखील मोडली. यामुळे ओटीपीच्याही पुढे जात नेट बँकिंग आणि मोबाइल अॅक्सेसद्वारे आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून कोणत्याही अॅप अथवा लिंकचा वापर सावधरित्या करण्याच्या सूचना गुन्हे शाखेने केल्या आहेत.

वर्ष : गुन्हे (आर्थिक फसवणूक)
२०१९ : ५५

२०२० : ६९

२०२१ : ३८

२०२२ : ११

काय कराल?
आर्थिक फसवणूक झाल्याचे समजल्यास तीन तासांच्या आत बँकेत कळवावे. यासह बँकेच्या व्यवहारांची प्रत सायबर पोलिसांकडे द्यावी. यासोबत फसवणूक झाल्याचा अर्जही सादर करावा. जेणेकरून सायबर पोलिस संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करतील. यानंतर त्वरित बँकेला पोलिसांतर्फे ई-मेल करण्यात येतो. त्याद्वारे पोलिस व्यवहार थांबवून पुढील चौकशीच्या सूचना करतात. यामुळे हा व्यवहार गोठवून फसवणुकीची रक्कम मूळ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते.

फसवणुकीचे नवे फंडे
– खोट्या नावाने बँक खाते सुरू करतात

– मोबाइलचे सीमकार्ड दुसऱ्याच्या नावे असते

– ग्राहकाला लिंक पाठवून मोबाइल अॅक्सेस घेतला जातो

– काही अॅपच्या माध्यमातून ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती संकलित केली जाते

– आयपी अॅड्रेस, मोबाइल लोकेशन सतत बदलले जाते

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button