मासेमारीसाठी वैनगंगा नदीत गेलेले सहा मासेमार वाढत्या पाणी पातळीमुळे सोमवारी नदीच्या मधोमध अडकले
![Six fishermen who had gone to the Wainganga river for fishing got stuck in the middle of the river on Monday due to the rising water level](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Six-fishermen-who-had-gone-to-the-Wainganga-river-for-fishing-got-stuck-in-the-middle-of-the-river-on-Monday-due-to-the-rising-water-level.jpg)
भंडाराः मासेमारीसाठी वैनगंगा नदीत गेलेले सहा मासेमार वाढत्या पाणी पातळीमुळे सोमवारी नदीच्या मधोमध अडकले होते. माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ घटनास्थळ गाठले. परंतु, रात्र झाल्याने अंधार होता. पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचण येत होती. अशा कठीण प्रसंगी मासेमारांनी जिवाची बाजी लावत नदी पार केली. मंगळवारी पहाटे तीन वाजता किनारा गाठला. पवनी तालुक्यातील पाथरी येथे हा थरारक प्रसंग घडला.
– गोसेखुर्द धरणाच्या बुडीत गावांच्या पहिल्या टप्प्यातील पाथरी हे गाव आहे. या गावातील शेतकऱ्यांची शेती प्रकल्पात गेली आहे.
– या गावाचे पुनर्वसन झाले. गावातील ढिवर समाजबांधवांची शेती प्रकल्पात गेल्याने मासेमारी हाच मुख्य व्यवसाय आहे.
– १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावातील रामा कांबळे, मंगेश मारबते, समीर कांबळी, अजय कांबळी, सुभाष मेश्राम व पंकज मारबते हे सहा जण तीन डोंग्याच्या सहाय्याने मासेमारीकरिता प्रकल्पात गेले होते.
– मासेमारीदरम्यान नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने ते पाथरीपासून दीड किलोमीटर अंतरावरील तांबकावाळी बेटावर झाडाच्या सहाय्याने डोंग्याला बांधून थांबले.
– मोबाइलची बॅटरी संपल्याने संपर्कही होत नव्हते. ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, अड्याळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, सरपंच जयश्री रोडगे व तलाठ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
– रात्रीचे ९.३० वाजल्याने जिल्हा आपत्ती विभागाने मंगळवारी सकाळी बोट टाकून मासेमारांना काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. आपत्ती विभागाने एसडीआरफची एक चमू पाचरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता.
– आपत्ती व्यवस्थापनाची मदत पोहचण्यापूर्वीच बेटावर अडकलेल्या मासेमारांनी एकजूट होऊन तीनही डोंग्यासह मंगळवारी पहाटे तीन वाजता पाथरी घाट गाठला. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
-मागील पाच ते सहा वर्षांत मासेमारी करताना वीज पडून तर कधी नाव उलटून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र शासनाने त्यांना आर्थिक मदत किंवा सुरक्षा पुरविली नाही.
– शासनाने मासेमारांना लाईफ जॅकेट देवून प्रकल्पात मासेमारी करण्याचे परवाने द्यावे, अशी मागणी आहे.
नदीपात्रात अडकलेले मासेमार मंगळवारी पहाटे सुखरुप काठावर पोहचले.