धक्कादायकः शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतकरी गेला शेतात, विजेचा शॉक, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
![Shocking, the farmer went to the field to irrigate the wheat crop, start the motor, to irrigate the water, electric shock, death of the girl in front of the mother,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Untitled-design-48-780x470.png)
अकोला : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी रात्रीच्या अंधारात आपल्या जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतली जाते. असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला होता. पहाटे पाच वाजता शेतातच एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी शेतकरी गेला. अचानक मोटरमध्ये बिघाड झाला आणि या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला.
मंगेश फाळके (वय ३२) असं या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, मृतक मंगेश हे आईसह त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आता घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने फळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, मंगेशच्या आईने हा थरारक प्रसंग स्वत: डोळ्यांनी बघितला.
नेमकी काय आहे संपूर्ण घटना?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चतारी गावात मंगेश फाळके (वय ३२) यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यामध्ये गव्हाचे पिक घेतलं आहे. दरम्यान रब्बी हंगामातील गव्हाला सध्या पाणी देणे सुरू आहे. मंगेश आणि त्यांची आई हे नियमितप्रमाणे कालही दुपारी ११ वाजता शेतात गेले होते. गव्हाला पाणी देण्यासाठी ते कॅनॉलजवळ गेले आणि तिथे त्यांनी पाण्याची मोटर सुरू केली. परंतू मोटर सुरू झाली नाही. मोटर का सुरू झाली नाही? हे पाहण्यासाठी मंगेश यांनी मोटरची बारकाईने पाहणी केली. परंतु पाहणी करत असताना मोटर पंपमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यात त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात मंगेश यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
यावेळी मंगेश यांची आई तिथेच उपस्थित होती. त्यांनी हा थरारक प्रसंग डोळ्यांनी बघितला. याची माहिती त्यांनी लागलीच शेजारील शेतात असलेल्या इतर शेतकऱ्यांना दिली. त्यांनीही घटनास्थळावर धाव घेतली आणि विद्युत कनेक्शन बंद करून कॅनॉलमधून मंगेशचा मृतदेह बाहेर काढला. याशिवाय चान्नी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगेश करायचे कुटुंबियांचा सांभाळ
मंगेश फाळके यांच्या वडिलांचं दोन वर्षांपुर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्वात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. चारही मुलींचे लग्न झाले असून मुलगा मंगेश हा सर्वात लहान आहे. वडिलांच्या निधनानंतर आई, पत्नी अन् स्वतःच मुलगा यांची जबाबदारी मंगेश यांच्या खांद्यावर आली. आता कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गेल्याने अख्ख कुटुंबावर मोठं संकट उभं राहिलं आहे. कारण घरातील प्रमुख व्यक्तीला २ वर्षापूर्वी गमवावे लागले. आता मंगेश यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.