शिंदे समर्थक संतोष बांगर यांच्या अडचणी वाढणार? विधानसभेला टक्कर दिलेला नेता सेनेच्या वाटेवर
![Shinde supporter Santosh Bangar's problems will increase? A leader who has clashed with the Legislative Assembly is on the way to the Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Shinde-supporter-Santosh-Bangars-problems-will-increase.jpg)
हिंगोली: २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अजित मगर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. अजित मगर यांनी समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीत शिवसेनेत प्रवेशाबाबतच्या विषयाचा आग्रह करण्यात आला. मगर यांना शिवसेनेकडून बोलावणं आल्याचं असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, अजित मगर हे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसत असली तरी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर शिवसेनेचे संतोष बांगर यांना त्यांनी टक्कर दिली होती.
संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्यामुळे संतोष बांगर यांना प्रतिस्पर्धी म्हणून अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. मात्र, मगर यांनी पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथे 22 जुलैला महादेवाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अजित मगर आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. मगर यांना काही प्रमुख पक्षाकडून पक्षात येण्यासाठी विचारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आणि समर्थकांची मते जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
अजित मगर यांनी माहिती देताच कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा त्यांना आग्रह धरला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मगर यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी,अशी मागणी करण्याचा आग्रह देखील करण्यात आला. अजित मगर हे नेमके शिवसेनेत प्रवेश करणार की नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेशाचा आग्रह धरला आहे. मात्र, मी लवकरच माझी भूमिका जाहीर करणार आहे.असे अजित मगर यांनी म्हटले आहे. अजित मगर जर शिवसेनेत गेले तर संतोष बांगर यांना मात्र येणाऱ्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
माजी खासदार सुभाष वानखेडे शिवसेनेत
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. उद्धव ठाकरेंनी यानंतर मोठी खेळी करत माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षा प्रवेश दिला आहे. सुभाष वानखेडे यांनी आमदार आणि खासदार म्हणून काम केलेलं आहे. सूर्यकांता पाटील यांना पराभूत करत ते लोकसभेत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा सुभाष वानखेडे शिवसेनेत परतल्यानं हेमंत पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.