![Remal, cyclone, hit, 21 hours later, airport, Train, three, for hours, closed,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/flight-780x470.jpg)
कोलकाता : रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासून २१ तासांसाठी बंद ठेवण्यात आलेले नेताजी सुभाष चंद्र बोस अर्थात कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज अखेर सोमवारी सकाळी सुरू करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
इंडिगो विमान कंपनीच्या कोलकाता-पोर्ट ब्लेअर या विमानाने सोमवारी सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांनी या विमानतळावरून पहिले उड्डाण केले. तर सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी गुवाहाटी-कोलकाता विमान या विमानतळावर उतरणारे पहिले विमान ठरले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अन्य उड्डाणांसाठी चेक-इनची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याआधी रविवारी दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी कोलकाता विमानतळावरून अखेरचे विमान सुटले होते.
कोलकाता विमानतळावरील विमानांचे उड्डाण व आगमन सुरू झाले असले, तरी परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी रात्री ८.३० वाजता पश्चिम बंगालला तडाखा दिलेल्या चक्रीवादळामुळे कोलकाता शहरासह राज्याच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. वादळाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून २१ तास विमानतळाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला होता. या कालावधीत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गांवरील ३९४ विमानांचे प्रस्थान व आगमन रद्द राहील, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक प्रवाशांची रखडपट्टी झाली होती.
रेल्वे तीन तासांसाठी बंद
पूर्व रेल्वेच्या सियाल्दा विभागातील रेल्वे सेवा तीन तास बंद ठेवण्यात आली होती. ती सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. मात्र कोलकाता मेट्रोच्या पार्क स्ट्रीट आणि एस्प्लनेड स्थानकांजवळ पाणी साचल्यामुळे, गिरिश पार्क ते महानायक उत्तर कुमार स्थानक या दरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाली. रेमल चक्रीवादळाचा तडाखा २०२०मध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळाच्या तुलनेत कमी असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.