रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध विदर्भ आमनेसामने
मुंबई विदर्भविरुद्ध अडचणीत,कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे पहिल्या डावात ढेर

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध विदर्भ आमनेसामने आहेत. मुंबई विदर्भविरुद्ध अडचणीत सापडली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे हे तिघे अनुभवी फलंदाज पहिल्या डावात ढेर झाले. विदर्भाने पहिल्या डावात 383 धावा केल्या. मुंबईने या धावांच्या प्रत्युत्तरात एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावले. मुंबईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या आहेत. मुंबई अजून 195 धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडियाच्या या 3 दिग्गज फलंदाजांनी निर्णायक सामन्यात घोर निराशा केली. विदर्भाच्या पार्थ रेखाडे याने या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
मुंबईची पहिल्या डावात फार निराशाजनक सुरुवात राहिली. युवा सलामीवर आयुष म्हात्रे 18 धावांवर आऊट झाला. त्यानंतर आकाश आनंद आणि सिद्धेश लाड या दोघांनी मुंबईला 85 धावांपर्यंत पोहचवलं. सिद्धेश लाड 35 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर पार्थ रेखाडे याने मुंबईला दणका देत एकाच ओव्हरमध्ये 3 झटके दिले. विदर्भाने यासह मुंबईला बॅकफुटवर ढकललं
हेही वाचा : सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार; राधाकृष्ण विखे पाटील
एकाच ओव्हरमध्ये 3 झटके
पार्थ रेखाडे मुंबईच्या डावातील 41 वी ओव्हर टाकायला आला. पार्थने कर्णधार अजिंक्य रहाणे याला क्लिन बोल्ड केलं. रहाणेने 24 धावा केल्या. तर त्यानंतर पार्थने सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांना आऊट केलं. पार्थने या दोघांना भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे मुंबईची स्थिती 5 बाद 113 अशी झाली.
त्यानंतर हर्ष दुबे याने 42 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर मुंबईला सहावा झटका दिला. त्यामुळे मुंबईची 6 बाद 118 अशी स्थिती झाली. शार्दूल ठाकुर याच्या रुपात मुंबईने सातवी आणि दुसऱ्या दिवसातील अखेरची विकेट गमावली. शार्दूलने 37 धावा केल्या. त्याआधी शिवम दुबे याने विदर्भाला 400 पार पोहचण्यापासून रोखलं. शिवमने 49 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर विदर्भासाठी ध्रुव शौरे याने 74, दानिशने 79, करुण नायर याने 45 आणि राठोडने 54 धावांचं योगदान दिलं.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, पार्थ रेखाडे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, हर्ष दुबे, दर्शन नळकांडे, यश ठाकूर आणि नचिकेत भुते.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.