”पुष्पा’ अभी झुका नहीं’; वनविभागाच्या धाडसी कारवाईत मिळाले लाखो रुपयांचे सागवान लाकूड
!["Pushpa' abi juka nahi"; Teak wood worth lakhs of rupees was obtained in a bold operation by the forest department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Pushpa-abi-juka-nahi.jpg)
गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानसाठी प्रसिद्ध आहे. तीन राज्यांची सीमा असल्याने या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगाणाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळेच येथे सागवान तस्करी सुरूच आहे. सध्या सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती आहे. तालुक्यातील विविध नदी,नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीतही नदी नाल्यातून सागवान तस्करी केली जात आहे. मात्र, यावेळी वनविभागाने धाडसी कारवाई करत १८ सागवान लाकूड पकडले. तस्करांचा यावेळी डाव फसला असला, तरी ‘पुष्पा’ अजूनही झुकला नाही हेच स्पष्ट झाले आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी देचली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पेरकाभट्टी नियतक्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना मौजा खम्मासूर जवळील नालापात्रातून तब्बल १८ सागवानी लाकूड पकडण्यात आले. यात एकही आरोपी मिळाले नसले तरी, लाखो रुपयांचा सागवान पकडण्यात वन विभागाला यश आले. सध्या नदी-नाल्याना पूर आल्याने जंगलातील मौल्यवान सागवान ओंडके वाहून जाताना सर्वांनाच दिसत आहे. मात्र, ही सागवान लाकडे वन विभागाने कापून बिटात साठवलेले आहे की, तस्करीसाठी अवैधरित्या कापलेले आहे ? हे तर चौकशीअंतीच कळणार आहे. याचा तपास वन विभाग करीत आहे.
सिरोंचा वन विभागात सिरोंचा, आसरअली,देचली,बामणी,जिमलगट्टा,झिंगानूर,कमलापूर आणि प्राणहिता असे एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत. यातील सिरोंचा, आसरअली, देचली, झिंगाणुर या वनपरिक्षेत्रातील जंगल तर तस्करांच्या रडारवर आहे. हे तर या परिसरात या अगोदर घडलेल्या विविध घटनांवरून लक्षात येते. विशेष म्हणजे आसरअली मार्गे तेलंगणा राज्यात सागवान तस्करीचे अनेक प्रकरण यापूर्वी उघडकीस आले. त्यामुळेच सिरोंचा वन विभागाचे तत्कालीन उप वनसंरक्षक सुमित कुमार यांनी तेलंगाणा राज्याच्या सीमेवर दोन्ही रस्त्यावर तपासणी नाका उभारले.तरीही या भागात तस्करी कमी होताना दिसत नाही. तपासणी नाक्यावर पहारा देत असताना तस्करांच्या हल्ल्यात एका वनमजुराचा जीव गेल्याचीही घटना याठिकाणी घडली होती.त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याठिकाणी डोळ्यात तेल टाकून सेवा द्यावी लागते.
परिसरातील नदी, नाले तुडुंब भरून वाहताना सुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून केलेली ही कारवाई धाडसीच म्हणावे लागेल. असे असलेतरी या भागात सुरू असलेली सागवान तस्करी आणि सक्रिय असलेली आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केंव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कारवाया झाल्या. मात्र,’पुष्पा’ला झुकविण्यात वन विभागाला अजूनही यश आले नाही हे विशेष.