गडचिरोलीमधील सूरजागड येथे प्रस्तावित वाढीव उत्खननामुळे १३ गावांवर विस्थापनाचे संकट
![Proposed increased mining at Surjagad in Gadchiroli threatens displacement of 13 villages](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/सगलगलु.jpg)
गडचिरोली : विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या सूरजागड लोहप्रकल्पात वाढीव उत्खनन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे एटापल्ली तालुक्यातील १३ आदिवासी बहुल गावे प्रभावित होणार असल्याने त्यांना भविष्यात विस्थापनाचा धोका निर्माण होऊ शकतो. येत्या २७ ऑक्टोबरला प्रशासनाकडून तक्रारी ऐकण्यासाठी जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंदर्भात पत्र काढले असून पीडित आदिवासींकडून याविरोधात संताप व्यक्त होत आहे.सूरजागड लोहखाणीत सुरू असलेल्या उत्खननामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. खराब रस्ते, कायम होणारी वाहतूक कोंडी, धूळ आणि प्रदूषणामुळे ते हैराण आहेत. आता खाणीचे कंत्राट असलेल्या लॉयड मेटल्स आणि एनर्जी ली. या कंपनीला ३४८ हेक्टरवर सुरू असलेले उत्खनन वाढवून १० दशलक्ष टन इतका माल खाणीतून काढायचा आहे.
मात्र, यामुळे त्या परिसरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून एटापल्ली तालुक्यातील बांडे, मलमपाडी, परसलगोंदी, सूरजागड, हेड्री, मंगेर, इकारा खु., करमपल्ली, पेठा, झारेगुडा, कुद्री, नागुलवाडी, मोहर्ली अशी एकूण १३ गावे प्रभावित होणार आहेत. त्यासाठी येत्या २७ ऑक्टोबरला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप व तक्रारी एकूण घेण्यासाठी पर्यावरणविषयक जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. मात्र, या गावातील आदिवासी नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे.
हळूहळू कंपनी या भागात आपले प्रस्त वाढवीत आहे. खाणीतून अधिक उत्पादन घेण्याच्या लालसेने एकेकाळी निसर्ग समृद्ध असलेल्या भागाला प्रदूषणाच्या गर्तेत ढकलत आहेत. भविष्यात आमच्यावर गाव सोडून जाण्याची वेळ येईल. तेव्हा प्रशासन केवळ कंपनीचाच विचार करणार की आम्हाला वाचविणार असा संतप्त सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे. हे सर्व घडत असताना लोकप्रतिनिधी गप्प असल्याने त्यांच्याविरोधात देखील या नागरिकांमध्ये संताप आहे.
आम्हाला विस्थापित करण्याचा प्रयत्न
आम्ही आदिवासी समाज खऱ्या अर्थाने या जंगलाचे रक्षणकर्ते आहोत. खाणीमुळे आमचा परिसर पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासन लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कंपनीच्या मनात येईल तेव्हा ते उत्पादन वाढवण्याच्या योजना आखतात. जनसुनावणी घ्यायची असल्यास एटापल्लीत घ्यावी. एवढे लोक गडचिरोलीला कसे जाणार. यामुळे १३ गावे प्रभावित होणार आहे. गडचिरोलीचे नवनियुक्त पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी आमची बाजू ऐकून घ्यावी. – अजय मडावी सामाजिक कार्यकर्ते, एटापल्ली