पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत; संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा
पिंपरी | श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येत आहेत. लोकार्पणानंतर माळवाडी येथे संवाद सभा होईल. दुपारी १.३५ ते दुपारी ३.०५ यावेळेत ते देहूत असणार आहेत. दरम्यान श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.
तुकोबारायांचा अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर नदीकाठच्या दगडी शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस अनुष्ठान केले. ही शिळा मुख्य देऊळवाड्यात आहे. या शिळा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. नव्याने बांधलेले शिळा मंदिर संपूर्ण दगडात आहे. मंदिराला दोन सुवर्ण कळस आहेत. मुख्य गाभारा, मंडप यासह मंदिराच्या चार कोपऱ्यावर चार कळस आहेत. तुकोबारायांची नवीन मूर्ती बनविण्यात आली आहे.
असा असेल दौरा
दुपारी १.१५ – पुणे विमानतळावरून देहू हेलिपॅडकडे प्रयाण
१.३५ – देहू हेलिपॅड येथे आगमन
१.४० – श्री संत तुकाराम महाराज मंदिराकडे मोटारीने प्रयाण
१.४५ – मंदिर लोकार्पण व संवाद सभा
३.०५ – हेलिपॅडकडे प्रयाण