दोन वर्षांपासून बंद असलेली प्रगती एक्स्प्रेस विस्टाडोमसह रुळांवर परतणार; २५ जुलैपासून रूळावर, असा असेल प्रवास
![Pragati Express, which has been closed for two years, will return to the tracks with Vistadome; On track from July 25, the journey will be like this](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Pragati-Express-which-has-been-closed-for-two-years-will-return-to-the-tracks-with-Vistadome-On-track-from-July-25-the-journey-will-be-like-this.jpg)
मुंबई | करोनाकाळापासून अर्थात दोन वर्षांपासून बंद असलेली प्रगती एक्स्प्रेस विस्टाडोमसह (पारदर्शक डब्यासह) रुळांवर परतणार आहे. २७ जुलैपासून ही गाडी प्रवासीसेवेत दाखल होणार आहे. तर येत्या महिनाभरात मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि पुणे-सिकंदराबाद जनशताब्दी एक्स्प्रेसला ऑगस्टअखेर विस्टाडोम जोडण्यात येणार आहे.
प्रगतीचा प्रवास असा असेल…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून (१२१२५) पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस २५ जुलैपासून रोज दुपारी ४.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७.५० वाजता पुणे येथे पोहोचेल. १२१२६ ही गाडी पुण्याहून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि मुंबईत त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता दाखल होईल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा आणि शिवाजीनगर असे थांबे असतील. तर २० जुलैपासून आरक्षण सुरू होईल.
… अशी असेल डब्यांची व्यवस्था
एक पारदर्शक डबा, एक वातानुकूलित चेअर कार, ११ द्वितीय श्रेणी चेअर कार (पाच पूर्णपणे आरक्षित, चार अनारक्षित, एक मासिक तिकीटधारकांसाठी आणि एक महिला कोच-महिला मासिक तिकीटधारकांसाठी ५४ जागा आणि महिलांसाठी ५४ राखीव जागा) आणि गार्डच्या ब्रेक व्हॅनसह एक सामान्य द्वितीय श्रेणी या डब्यासह प्रगती एक्स्प्रेस धावणार आहे.
चार गाड्यांना विस्टाडोम
मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आणि आता मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस या चार गाड्यांना विस्टाडोम. ऑगस्टअखेर करमाळी तेजस आणि पुणे जनशताब्दीलाही विस्टाडोम जोडण्यात येणार आहे.
शंभर टक्के प्रतिसाद
जनशताब्दी, डेक्कन आणि डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधील पारदर्शक डब्याला १०० टक्के प्रवासी प्रतिसाद लाभलेला आहे. पावसाळ्यात घाटमाथ्यावरील, तसेच प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रवासी या डब्याला प्राधान्य देत आहेत.