तलवारबाजी खेळाडू पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना , स्पर्धा खेळून घरी आली अन्…
![Police officer's daughter commits suicide, came home from competition and...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Police-officers-daughter-commits-suicide-came-home-from-competition-and....png)
औरंगाबाद : तलवारबाजी खेळाडू पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना पडेगाव परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तरुणीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचाच तपास सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्रोकांती शामकांत वडनेरे वय-१९ (रा. दक्षता कॉलनी पडेगाव) असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अब्रोकांती नुकतीच नाशिक इथं झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत सहभागी झाली होती. तिचे वडील पोलीस मुख्यालयात नोकरीला तर आई गृहिणी आहे. मोठा भाऊ उच्च शिक्षण घेत आहे.
अब्रोकांती नुकतीच बारावी पास झाली होती. तिने पाथरी येथील पाथरीकर महाविद्यालयात बीसीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर ती तलवारबाजी खेळात भाग घेत असे. रोज ती प्रशिक्षण घ्यायलाही जायची. नाशिक इथे झालेल्या तलवारबाजी स्पर्धेत ती सहभागी झाली होती. दोन दिवसांपूर्वीच ती घरी परतली.
मंगळवारी दुपारी भाऊ कॉलेजला आणि आई वडील बाहेर गेल्यानंतर तिने बेडरूममधील फॅनच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुपारी आई- वडील घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. एका गुणवंत खेळाडूच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिने नेमके कोणत्या करणारे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.