Uncategorizedपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

PMPML बससेवा अधिक सक्षम व आधुनिक होणे गरजेचे : प्रा. सोनाली गव्हाणे यांची सर्वसाधारण सभेत मागणी.

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधि : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिककेंद्री करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) च्या बससेवेत तातडीच्या सुधारणा व विस्तार करण्याची ठोस मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. ही मागणी प्रभाग क्रमांक ७ च्या विद्यमान नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी मांडली.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही दोन्ही शहरे औद्योगिक, शैक्षणिक व आयटी क्षेत्रातील वेगाने विकसित होत असलेली महानगरे असून, दररोज लाखो नागरिक रोजगार, शिक्षण, आरोग्य सेवा व व्यवसायासाठी प्रवास करतात. या दोन्ही शहरांची सार्वजनिक वाहतूक प्रामुख्याने PMPML मार्फत चालवली जाते. या व्यवस्थेचा आर्थिक भार सुमारे ६० टक्के पुणे महानगरपालिका तर ४० टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिका उचलत असतानाही, पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रभाग, उपनगरे व नव्याने विकसित भागांमध्ये अद्याप पुरेशी, नियमित व दर्जेदार बससेवा उपलब्ध नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

हेही वाचा : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा

सोनाली गव्हाणे यांनी सांगितले की, “शहरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि वायू प्रदूषण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हाच या समस्यांवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय आहे.” सध्या कार्यरत असलेल्या अनेक PMPML बसेसची अवस्था दयनीय असून वारंवार ब्रेकडाऊनमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व दिव्यांग प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच नव्याने विकसित वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि व्यापारी केंद्रांपर्यंत थेट बस कनेक्टिव्हिटी अपुरी असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देत स्पष्ट भूमिका मांडली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

“केंद्र व राज्य शासन ग्रीन एनर्जी आणि पर्यावरणपूरक धोरणांचा पुरस्कार करत असताना, शहरातील सार्वजनिक वाहतूकही त्याच दिशेने नेणे गरजेचे आहे. ई-बस, सीएनजी किंवा इतर ग्रीन एनर्जीवर आधारित बससेवेचा विस्तार केल्यास प्रदूषण कमी होईल, नागरिकांचा प्रवास सुलभ होईल आणि शहर अधिक शाश्वत बनेल. शहरातील पीएमपीएमएल व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
– प्रा. सोनाली गव्हाणे (नगरसेविका, प्रभाग क्र. 7)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button