आता लाडू खाऊन वाढणार हिमोग्लोबिन, किशोरवयीन मुलींसाठी जिल्हा प्रशासनाची ‘संजीवनी’
![Now Hemoglobin will increase by eating Ladoo, District Administration's 'Sanjeevani' for teenage girls](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Now-Hemoglobin-will-increase-by-eating-Ladoo-District-Administrations-Sanjeevani-for-teenage-girls.png)
गडचिरोली : १४ ते १८ वर्षे या वयोगटातील ज्या किशोरवयीन मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण अधिक आहे, अशा किशोरवयीन मुलींना मोहफुलापासून तयार केलेले लाडू अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्यामार्फत तयार करून आशा वर्कर यांच्या मदतीने वाटप करण्यात येणार आहे. त्यातून रक्ताक्षय दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील अतिदुर्गम धानोरा, अहेरी भामरागड व एटापल्ली या चार तालुक्यातील १४ ते १८ वर्षे वयोगटातील ज्या किशोरवयीन मुलींमध्ये रक्ताशयाचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यासाठी ‘किशोर संजीवनी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पारडी कुपी येथे बुधवारी एक कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपक्रम कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले, पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी बीएस साळवे कृषी अधिकारी पीपी पदा आदी उपस्थित होते.
१० ऑगस्ट रोजी महिला आणि बालकल्याण विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडचिरोलीमधील अंगणवाडी केंद्र पारडी कुपा इथे किशोर संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः उपस्थित लावली. गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांना आरोग्य व पोषण आहाराविषयी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील धानोरा, अहेरी, भामरागड व एटापल्ली या चार अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुक्यांतील १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. त्यावर मात करण्यासाठी मोहफुलपासून तयार केलेले लाडू वाटप करण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर चार तालुके घेतले असलेतरी पुढे सर्वच तालुक्यात बालविकास विभागामार्फत हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) अर्चना इंगोले यांनी दिली आहे.