तळवडे-रुपीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘विजय निर्धार’
भव्य पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 तळवडे-रुपीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार वेग घेत असून, आज झालेल्या भव्य पदयात्रेला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रुपीनगरमधील ‘एकता चौक’ येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत आमदार रोहित पवार आणि आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रभाग 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा भालेकर आणि चारुलता सोनवणे हे उमेदवार रिंगणात असून पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडला.
नागरिकांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी, “तळवडे-रुपीनगर प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पारदर्शक कारभार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे आवाहन केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२६ : राष्ट्रवादी काँग्रेसची विजय संकल्प सभा उत्साहात
दरम्यान, सुनील शेळके यांनीदेखील तळवडे-रुपीनगरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेससोबत नेहमीच भक्कमपणे उभे राहिल्याचा विश्वास व्यक्त करत, “महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील,” असा विश्वास व्यक्त केला.
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयाची हमी दिल्याचे चित्र दिसून आले. मतदानाची तारीख जवळ येत असताना प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावत असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.




