breaking-newsTOP NewsUncategorizedपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या सर्व कार्यालयात १५ ऑगस्ट पासून दररोज ‘राष्ट्रगीत’

पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यावर्षीपासून महापालिकेच्या पिंपरी येथील  मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजता राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी निर्णय घेतला असून भारतीय स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच दि. १५ ऑगस्ट २०२२ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी दिले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले  जात आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणा-या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता प्रत्येकाच्या अंगी यावी म्हणून प्रत्येकजण सदैव प्रयत्न करत असतो.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामकाजासाठी महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये देशाप्रती असलेला आदर अधिक वृद्धींगत करणे तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची ज्योत तेवत ठेवण्यासोबतच शिस्त आणि सकारात्मक उर्जा वाढविण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता ‘जन गण मन’ राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. राष्ट्रगीतातून होणारे देशाचे मंगलगान आपल्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करत असते. शिवाय सेवेची भावना देखील यातून वृद्धिंगत होत असते. शासकीय कार्यालयांमध्ये अशी प्रथा सुरु करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button