केमिकल लोच्या झालेला मुन्नाभाई; मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंचा खरपूस समाचार
![Munnabhai, who has been exposed to chemicals; News of Raj Thackeray from the Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/केमिकल-लोच्या-झालेला-मुन्नाभाई-मुख्यमंत्र्यांकडून-राज-ठाकरेंचा-खरपूस-समाचार.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्द्यावरून करण्यात येणाऱ्या आरोपाला बीकेसी येथील जाहीर सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ही भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत का गेली, याचंही कारण सांगितलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही चांगलाच समाचार घेता.
‘मला एका शिवसैनिकाचा फोन आला होता. त्याने विचारलं तुम्ही लगे रहो मुन्ना भाई हा सिनेमा बघितला का? त्यावर मी विचारले का रे…तर तो म्हणाला की तशी एक केस आपल्याकडे आहे. तो नाही का त्याला आता बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं आहे. कधी हिंदुत्वाच्या नादी लागतात, कधी मराठीच्या नादी लागतात. मी म्हटलं सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्ना भाई काढलास तू? सिनेमातल्या मुन्नाभाईचा जसा डोक्याचा केमिकल लोच्या झाल्या होता, तसा यांच्याही झाला आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे.
अयोध्या दौऱ्यावरूनही साधला निशाणा
राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर टीका केली. ‘काही लोक आता अयोध्येला जाणार असतीत तर जाऊद्या. आदित्यही १५ जून रोजी पुन्हा एकदा अयोध्येला जात आहे. मागच्या आठवड्यात तो तिरुपतीला गेला होता. आपण अयोध्येला गेलो तेव्हा राम मंदिराचा प्रश्न सुटलेला नव्हता. २०१८ मध्ये आपण राम मंदिरासाठी विशेष कायदा करण्याची मागणी केली होती आणि २०१९ मध्ये कोर्टाचाच निर्णय आला,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.