Monsoon Forecast India: यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार?
![Monsoon Forecast India: Less than average rainfall this year?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Monsoon-Forecast-India-यंदा-सरासरीपेक्षा-कमी-पाऊस-पडणार-हवामान-शास्त्रज्ञांनी.jpg)
पुणे : मान्सून काळातील पावसावर प्रभाव टाकणारा हिंदी महासागरातील महत्त्वाचा घटक ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) यंदा ‘निगेटिव्ह’ राहण्याचा अंदाज काही हवामानशास्त्रीय मॉडेल्समधून वर्तवण्यात आला आहे. ‘निगेटिव्ह आयओडी’ स्थिती असताना देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो, असे आकडेवारी सांगते. मात्र, प्रशांत महासागरातील अनुकूल स्थितीमुळे मान्सून सामान्य राहू शकतो, असे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, तर ती स्थिती पॉझिटिव्ह आयओडी आणि पूर्व भागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, तर ती स्थिती ‘निगेटिव्ह आयओडी’ मानली जाते. ‘पॉझिटिव्ह आयओडी’ची स्थिती सक्रिय असताना बहुतेक वेळा भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस; तर ‘निगेटीव्ह आयओडी’च्या स्थितीत देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असते. ‘आयओडी’च्या आगामी स्थितीबाबत वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै म्हणाले, ‘सध्या हिंदी महासागरात ‘आयओडी’ची स्थिती न्यूट्रल आहे. मान्सून काळात ‘आयओडी निगेटिव्ह’ राहण्याचा अंदाज बऱ्याच मॉडेल्समधून वर्तवण्यात आला आहे. मान्सून काळातील पावसावर ‘निगेटिव्ह आयओडी’चा प्रतिकूल परिणाम असतो. मात्र, दुसरीकडे प्रशांत महासागरात मान्सून काळात तीव्र ला निनाची स्थिती राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ला निनाची स्थिती असताना भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते. ‘निगेटिव्ह आयओडी’चा प्रभाव ला निनामुळे कमी होऊन देशात मान्सून काळात सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो.’
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या मान्सूनच्या हंगामी अंदाजामध्ये यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मे महिन्यापर्यंतच्या हवामानाच्या स्थितीला गृहीत धरून पुढील आठवड्यात मान्सूनचा दुसरा टप्प्यातील दीर्घकालीन अंदाज जाहीर होणे अपेक्षित आहे. त्या अंदाजामध्ये आयओडी आणि ला निना या दोन्ही स्थितींचा आगामी मान्सूनवर कसा प्रभाव राहील याचा आढावा घेतला जाईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हंगामी वाऱ्यांची दिशा प्रतिकूल
यंदाच्या मान्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्रात सर्वसाधारण तारखेच्या तुलनेत सहा ते सात दिवस आधीच प्रवेश केला. मात्र, त्यानंतर हंगामी वाऱ्यांची दिशा अनुकूल नसल्यामुळे मान्सूनची त्यापुढील वाटचाल थांबल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे वारे नैऋत्येकडून वाहण्याची शक्यता असून, त्यानंतर मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होईल. आयएमडीने वर्तवल्याप्रमाणे मान्सूनचे केरळमधील आगमन २७ मेच्या आसपास होऊ शकते,’ असे डॉ. पै यांनी सांगितले.