Maval Loksabha : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची दुचाकी ‘रॅली’, पार्थ पवार यांना तरुणाईची खंबीर साथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190407-WA0042.jpg)
- निगडी प्राधिकरणातील वातावरण राष्ट्रवादीमय
- दुचाकी रॅलीत महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत असतानाच आज मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जोगेंद्र कवाडे गटाच्या महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रॅलीमध्ये एक हजारहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश होता. जागोजागी रॅली थांबवून मतदार महिलांनी उमेदवार पार्थ पवार यांचे औक्षण केले.
- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील निगडी येथे भक्ती-शक्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज अणि संत तुकाराम महाराज यांच्या समूह शिल्पाला उमेदवार पार्थ पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर रॅलीला सुरूवात झाली. अभिवादन करताना पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, यवा नेते संदीप पवार, नेते नाना काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, नगरसेवक मयूर कलाटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, उपमहापौर राजू मिसाळ असे पक्षाचे आजि-माजी पदाधिकारी, नगरसेवक रॅलीत सहभागी झाले होते.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उमेदवार पार्थ पवार यांचे आगमण होताच कार्यकर्त्यांनी गगणभेदी घोषणा देण्यास सुरूवात केली. “अजित दादा तुम आगे बडो… हम तुम्हारे साथ है…”, “पार्थ दादा तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है…”, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा…!” अशा घोषणा देत रॅलीतील तरुणाईचा मोर्चा निगडी प्राधिकरणात थाटात मार्गस्त झाला. काचघर ते भेळ चौक, एलआयजी कॉलनी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, पोलीस चौकी, संभाजी चौक, म्हाळसाकांत चौक, हनुमान मंदिर यामार्गे दुचाकी रॅलीचा ताफा वेगाने धावत होता. राष्ट्रवादी, काँग्रेस, कवाडे गटाचे फडकणारे झेंडे पाहून तरूणांचा रॅलीतील सहभाग वाढत होता. विठ्ठलवाडी, दत्तवाडी याठिकाणी रॅली आली तेव्हा रॅलीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या हजाराहून अधिक झाली होती. निगडी प्राधिकरणातील संबंध परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.
- त्यानंतर सेंट उर्सुल्ला, बँक ऑफ महाराष्ट्र, मधुकर पवळे उड्डाण पुल, खंडोबा माळ यामार्गे रॅली मोहननगर, काळभोरनगर या भागाकडे रवाना झाली. आनंदनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी मार्गे रॅली पुढे पिंपरीत आली. उनाचा पारा चढलेला असतानाच भरदुपारी एक वाजता देखील रॅलीतील तरुणाईचा जोष आणि उत्साह वाढतच होता.