मराठमोळे ऑलिम्पिकपटू गाजविणार दिल्लीे, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज!
सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव यांच्या कामगिरीकडे लक्ष

नवी दिल्ली : सलग दुसर्यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल वाजले असून, महाराष्ट्र स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत.
दुसरी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 20 ते 27 मार्च दरम्यान दिल्लीत 3 क्रीडा संकुलात रंगणार आहे. आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी व टेबलटेनिस या 6 क्रीडाप्रकारात देशभरातील 1300 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम व डॉ. कर्णी सिंग शूटींग रेंज सज्ज झाली आहे.
स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 78 क्रीडापटू पात्र ठरले आहेत. सर्वाधिक 36 खेळाडू अॅथलेटिक्समध्ये पदकांसाठी झुंजणार आहेत. खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी असे एकूण 120 जणांचे पथक असणार आहे. गत दिल्लीतील पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने 12 सुवर्ण, 7 रौप्य, 16 कांस्यपदकांसह 35 पदकांची कमाई केली होती. गत स्पर्धेत महाराष्ट्राला पाचवे स्थान प्राप्त झाले होते. यंदा महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून क्रमवारीत मुसंडी मारतील असा विश्वास पथकप्रमुख मिलिंद दिक्षीत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा बॅडमिंटन, अॅथलेटिक्स व नेमबाजीचा संघ पुण्यातून रवाना झाला आहे. या संघाला क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – कौतुकास्पद! आता दहावीपर्यंतचे शिक्षण मिळणार पूर्णपणे मोफत, ‘या’ महानगरपालिकेने घेतला निर्णय
बॅडमिंटन स्पर्धेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्राच्या विजयाची मोहिम बॅडमिंटन कोर्टपासून सुरू होणार आहे. सांगलीचा सुकांत कदम एस एल 4 गटात सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहेत. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असणार्या सुकांतने पॅरीस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली होती. प्रथमच तो खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये निलेश गायकवाड, मार्क धरमाई, प्रेम अले, आरती पाटील या महाराष्ट्राचे खेळाडूंही विजयासाठी मैदानात खेळताना दिसतील.
संदिप सलगरकडून महाराष्ट्राला अपेक्षा…
शुक्रवार 21 मार्चपासून अॅथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. संदिप सलगर, भाग्यश्री जाधव, दिलीप गावीत या पॅरीस ऑलिम्पिकपटूं अॅथलेटिक्सचे मैदान गाजविताना दिसतील. हातावर शस्त्रक्रिया झाल्याने भालाफेकपटू संदिप सलगरला पहिल्या स्पर्धेपासून वंचित रहावे लागले होते. संदिप प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार असून तो सुवर्णपदकासाठी फेकी करताना दिसेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या संदिपची 67 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी असल्याने संभाव्य विजेता म्हणून त्याचाच दिल्लीत डंका आहे.
भाग्यश्री जाधव लक्षवेधी…
गत स्पर्धेत भालाफेक व गोळाफेकीत दोन सुवर्णपदके जिंकणारी भाग्यश्री जाधव स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरणार आहे. सलग दुसर्यांदा दुहेरी सुवर्णपदकासाठी ती सज्ज झाली आहे. 400 मीटर शर्यत गाजविणारा दिलीप गावीत सलग दुसर्यांदा पदकासाठी उत्सुक आहे. नेमबाजीत कोल्हापूरचा ऑलिम्पिकपटू स्वरूप उन्हाळकर तर आर्चरीत मुंबईचा आशियाई पदकविजेता आदिल अन्सारी हे सलग दुसर्यांदा सुवर्ण पदकाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा