हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी लोकल वाहतूक विस्कळीत, गोवंडीजवळ रेल्वे रुळाला तडे
![Local traffic disrupted for the second day in a row on the Harbor Railway, track breaks near Govandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Local-traffic-disrupted-for-the-second-day-in-a-row-on-the-Harbor-Railway-track-breaks-near-Govandi.jpg)
मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा सुरु झाली, मात्र ती विलंबाने सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गिकेवर रुळाला तडे गेले होते. त्यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
नेमकं काय घडलं?
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर हार्बर मार्गावरील लोकलचा डबा घसरल्याने काल छोटा अपघात झाला होता. मंगळवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गोवंडी स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे सीएसएमटीकडून पनवेलच्या दिशेने जाणारी हार्बर रेल्वेसेवा काही काळासाठी बंद झाली होती.
रेल्वे रुळाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरु करण्यात आली, मात्र लोकल उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. ऑफिसला जाण्यासाठी लगबग सुरु असताना ऐन गर्दीच्या वेळी लोकल रखडल्याने प्रवाशांना आज पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.
काल कसा अपघात झाला?
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात (CSMT) हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन बंपरला धडकली. एरवी कोणतीही ट्रेन स्थानकात थांबल्यावरही बंपर आणि ट्रेन यांच्यात बरेच अंतर असते. मात्र, मंगळवारी सकाळी फलाट क्रमांक १ वरून ट्रेन (Local Train) मागे घेत असताना अचानक अपघात घडला. सिग्नल दिल्यानंतर ट्रेन पुढे जाण्याऐवजी मागे गेली. त्यामुळे लोकल ट्रेन थेट बंपरवर जाऊन आदळली. त्यानंतर ट्रेनचे दोन डबे रुळांवरून खाली घसरून एका बाजूला कलंडले. ट्रेन रूळावरून घसरल्यानंतर काही डबे प्लॅटफॉर्मला धडकले. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील काही लाद्याही तुटल्या.