Uncategorized

जित्याची खोड, गोपीला नाही जोड, राजकारणाचा नकोसा हिंसक मोड !

दोनच दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये संपूर्ण जनतेने नको, नको तो तमाशा पाहिला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये तेथे प्रचंड हमरीतुमरी झाली आणि शिवीगाळ करत तुंबळ हाणामारीही झाली. हा राडा एवढा प्रचंड होता, की त्याची दखल परदेशात सुद्धा घेतली गेली. आता मुख्य मुद्दा असा आहे, की विधिमंडळाच्या दरवाज्यात किंवा लॉबीमध्ये जर अशा प्रकारची हाणामारी होत असेल, तर सभागृहात एकमेकांना गोळ्या घालण्याचा प्रसंग लवकरच येणार, असे वाटायला लागते.

अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे..

विधानसभेत जो प्रमुख असतो म्हणजे अध्यक्ष असतो, त्याच्यावर धावून जाण्याचे प्रकार देखील गेल्याच आठवड्यात पाहण्यात आले. मग सांगा, गोळीबार करून समोरच्याला ठार मारले गेले, तर त्यात आश्चर्य काय? हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे लॉबीमध्ये घडलेला तो अभूतपूर्व पण नकोसा प्रसंग ! त्यानंतर मुख्यमंत्री चिडले, अध्यक्षांनी झापले, संबंधितांनी माफी मागितली..ही झाली मलम पट्टी..पण, मूळ ही घटना आहे, तिची जखम एवढी खोलवर आहे, की ती भरून येणे शक्य नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे !

नीतिमत्ता, विधिमंडळाच्या प्रतिमेचे धिंडवडे..

जनतेने या आमदारांना का निवडून दिले असावे, असा प्रश्न साहजिकच पडण्याची वेळ आली आहे. नीतिमत्ता वगैरे शब्दांना त्यांनी केव्हाच काळे फासले आहे आणि विधिमंडळाची प्रतिमा डागाळली, असे म्हणणे सुद्धा या प्रकारापुढे अत्यंत फिके आहे. शेवटी त्यातील एक समाधानाची बाब म्हणजे हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले आहे आणि त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू आहे. त्यापूर्वी, या दोघांनाही सभागृहात आणले गेले आणि दोघांनी खेद व्यक्त करावा, तसेच पुन्हा अशी घटना घडणार नाही, असे आश्वस्त करावे, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावले, ती गोष्ट ही त्यांच्यासाठी लाजीरवाणी वाटली नाही.

हेही वाचा –  अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ साजरा

निलंबनाची कारवाई अपेक्षित होती..

वास्तविक, या दोन्ही आमदारांना जबाबदारीची जाणीव नव्हती आणि कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटण्यासारखेही काही नव्हते, त्यामुळे दोघांना निलंबित केले जाईल, अशी सर्वांची इच्छा होती. पण, दोघांनाही सुधारण्याची एक संधी मिळाली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठीच विधानसभेच्या अध्यक्षांनी हा निकाल दिला असून सध्या प्रकरण तात्पुरते का होईना मिटले आहे.पण, असे प्रसंग किंवा प्रकरण लोकशाही आणि विधिमंडळाच्या प्रतिमेला लाज आणणारे आहे, हे सांगण्याची मुळीच गरज नाही !

पडळकर यांची तातडीने माफी..

हे सर्व प्रकरण अंगलट येत आहे, असे समजतात पडळकर यांनी मात्र तातडीने माफी मागून टाकली आणि वरिष्ठ तसेच न्यायालय जो निकाल देईल, तो मान्य असेल, असे जाहीर करून टाकले. तथापि, त्यांच्या समर्थकांनी जी कृती केली ती अतिशय चूक आहे. यात अजिबात शंका नाही. दुसरीकडे या हाणामारीच्या प्रसंगाला आव्हाड हे देखील तेवढेच जबाबदार आहेत, हे सुद्धा नाकारून चालणार नाही.

मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले..

ही घृणास्पद घटना घडण्यापूर्वी आव्हाड यांनी पडळकर यांना उगीचच उचकवण्याचा का प्रयत्न केला, हे पण समजू शकत नाही. घटनेपूर्वी एक दिवस याच लॉबीमध्ये आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराच्या नावाने घोषणा देऊन पडळकर यांना डिवचले होते. त्या घोषणा देण्याचे कारण काय, याचा खुलासा त्यांच्याकडे मागितला गेला पाहिजे आणि विधिमंडळाच्या आवारात किंबहुना अधिवेशन सुरू असताना अशा घोषणा देण्याचे कारण काय हे स्पष्ट केले पाहिजे. अर्थात, खऱ्या अर्थाने गुंड असणाऱ्या आव्हाड त्याचा खुलासा देतील अशी किंचितही अपेक्षा वाटत नाही.

गाडीच्या धक्क्याचे काय प्रकरण..

आता हाणामारीला मी जबाबदार नाही, असे पटवून देण्यासाठी नवनवीन कारणे शोधली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पडळकर यांचा गाडीचा धक्का लागला आणि बाचाबाची होऊन अखेरीस मारामारी झाली, हा आव्हाड यांनी नवा अध्याय सुरू केला आहे. त्यापूर्वी पडळकर यांच्या दिशेने केलेले हातवारे आणि मारलेले डायलॉग काय होते याचा सोक्षमोक्षही बावला पाहिजे.

माजलेले लोकप्रतिनिधी काय कामाचे?

सर्वसाधारणपणे सध्या सर्वच लोकप्रतिनिधींबद्दल जनतेचे मत फारसे चांगले नाही. त्यातच शिवराळ भाषा, गुंड मवाल्यासारखे वर्तन, सुसंस्कृतपणाचा लवलेशही नसल्यासारखा वावर असे हे लोकप्रतिनिधी आहेत का गल्लीतले गुंड आहेत असा संभ्रम निर्माण होतो. आव्हाड ज्या वेळेला कायदा-सुव्यवस्था, नियमांची भाषा करतात तेव्हा आपला भूतकाळ विसरला का, हा प्रश्न त्यांना विचारला जातो. करमूसे यांना केलेली मारहाण, ते विसरतात.. प्रतिक्रिया व्यक्त करताना वापरलेली अगदी खालच्या थराची भाषा विसरतात..या अधिवेशनात अगदी अतुल भातखळकर यांच्यापासून अनेकांनी त्यांचा अभ्यास किती अपूर्ण आहे, हे दाखवून दिल्याचे विसरतात. एक वेळ जयंत पाटील यांना भाजप, राष्ट्रवादी पक्ष सामील करून घेतील. मात्र आव्हाड यांना इतर कोणत्याही पक्षात जागा मिळेल असे वाटत नाही..

आव्हाडांना सोयर सुतक नाही..

आता या मुद्द्यावर आव्हाड म्हणतील, की मला कुठेही जायचे नाही. पण, आपल्या अस्तित्वाची अखेरची धडपड त्यांनी सुरू केली आहे, येण केण प्रकारेण प्रसिद्धी मिळवायची, हे त्यांचे तंत्र सर्वपरिचित आहे. मात्र त्यासाठी त्यांनी अजून अभ्यास करावा. संजय राऊत, रोहित पवार, सुषमा अंधारे संजय गायकवाड, राणे बंधू यांच्या पंक्तिपेक्षा खालच्या जागेवर ते वाटचाल करीत आहेत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ही म्हण सिद्ध करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. मुळामध्ये या मंडळींना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवले आहे, ते त्यांनी सोडवावेत,बाकी ठिकाणी लक्ष घालण्याची किंवा नाक खुपसण्याची काय गरज आहे?

रात्री-अपरात्री दंगा आणि नाटक..

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून दंग्याची अपेक्षा असते. पण, रात्री अपरात्री दंगा करायचा, वाटेल तसे तुसडेपणाने बोलायचे आणि कोणत्याही अभ्यासाशिवाय, पुराव्याशिवाय वटवट करायची, हे प्रथम त्यांनी थांबवायला हवे. त्या दिवशी रात्री रोहित पवार हे देखील त्यांच्या मदतीला धावले. पण, ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना ते बोलत होते, ते मुळीच सुसंस्कृतपणाचे नव्हते. बहुतेक मंडळींना निवडून काय यायचे असते, याची माहिती नाही. सत्ता मिळवायची..त्यातून पैसे काढायचे आणि पैशाच्या रूपाने पुन्हा निवडून येऊन सत्तेत बसायचे, एवढेच संस्कार झालेल्या या मंडळींनी वर्तनशास्त्राचा किमान अभ्यास करावा. आत्ताच्या नेत्यांच्या बाप मंडळींनी जे पेरले आहे, ते उगवत आहे. आता नव्याने चांगली पेरणी या मंडळींनी करावी तरच राजकारणाचे भवितव्य आशादायक दिसेल..

आता जनतेनेच विचार करावा..

अशा गुंड, मवाल्यांना निवडून देणाऱ्या मतदारांनीच आता सूज्ञपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. नीतीमत्तेची लक्तरे वेशीवर टांगणारे हे नालायक प्रतिनिधी पुन्हा सभागृहात येऊच नयेत, अशी तरतूद त्यांचे राजकीय पक्ष करणार नाहीत, पण मतदार करू शकतात, हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे हे निश्चित !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button