‘माझी नव्हे तुमची घरी बसण्याची वेळ आली’, भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद पेटला
!["It's time for you to sit at home, not mine," BJP-NCP leaders argued](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/NCP.jpg)
जळगाव | ‘शिवसेनेला बेडूक म्हणणार्या भाजप नेते गिरीश महाजन यांनी आधी स्वत: ला सुधारावे, त्यानंतर पक्षाला सुधारावे. गिरीश महाजन मला काय म्हणतील घरी बसा. गिरीश महाजन यांचीच घरी बसण्याची वेळ आता आली आहे’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे .
भुसावळ येथील एका कार्यक्रमात एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला बेडूक म्हणून शब्दप्रयोग केल्यानंतर त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर गिरीश महाजनांनी आम्ही आमचं बघून घेऊ म्हणत खडसेंना प्रत्युत्तर दिलं. खडसेंनी घरीच बसावे असा टोला महाजनांनी लगावला होता, यालाही एकनाथ खडसेंनी पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आज पदावर आहेत. मी पदावर नसलो म्हणून काय झालं. मात्र, या खडसेंनीच तुम्हाला मोठं केलं. महाजनांना बोलताही येत नव्हतं. त्यामुळे लायकही मीच त्यांना घडवलं असल्याचेही खडसे म्हणाले. गेल्या काळातील जिल्हा बँक असो, विकास सोसायट्या असो की बोदवड नगर पंचायत निवडणुका असो, एकही निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे ज्यांना मी मोठं केलं ते काय मला सल्ला देतील असा टोलाही खडसे यांनी महाजनांना लगावला.
राज्याच्या सत्तेत सहभागी एका मोठ्या पक्षाला विषयी बोलताना गिरीश महाजनांनी थोडा तरी विचार करावा, महाजन यांनी पदाला शोभेल असं काम करावं आणि जिल्ह्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.